पुणे : खडकवासला धरणातून ४५ हजार क्युसेक वेगाने विसर्ग केल्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील एकतानगरी परिसरातील सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. या भागातील सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
नदीकाठी असलेल्या एकतानगरी सोसायटीलगत असलेल्या द्वारका, जलपूजन आणि आनंद पार्कसह अनेक सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले. गेले दोन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्याने शुक्रवारी सकाळपासूनच काही प्रमाणात खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. पाणी सोडले जाणार असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने केले गेले.
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या सोसायट्यांमध्ये जाऊन जनजागृती करत पार्किंगमधील वाहने काढून शक्य असल्यास दुसरीकडे स्थलांतरित होण्याचे आवाहन करत होते.
महापौर मंजूषा नागपुरे यांनी शुक्रवारी सकाळपासूनच राजपूतनगर, पुलाचीवाडी, निंबजनगर, एकतानगरी आणि विठ्ठलनगर परिसराची पाहणी केली. या वेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाला आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच, नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले.
द्वारका, जलपूजन सोसायटीत पाणी
पाणी शिरल्यानंतर अनेक रहिवाशांनी वाहने आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी धावपळ झाली. सकाळी कामानिमित्त कार्यालयात गेलेले नागरिक दुपारी तातडीने घरी परतले. शिवणे येथील भीमनगर परिसरातील काही घरांमध्येही पाणी शिरल्याची घटना घडली.
या भागात पाणी घुसू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन महापालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वारंवार दिले जाते. मात्र, प्रत्येक वर्षी या भागातील सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी शिरते आणि नागरिकांना स्थलांतरीत करावे लागते, अशी तक्रार या भागातील नागरिकांकडून केली गेली.
पावसाचे पाणी शिरू नये, यासाठी येथे पूर संरक्षण भिंत उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून यापूर्वी तयार करण्यात आला होता. निविदा प्रक्रियेसह प्रशासकीय हालचालीही झाल्या. मात्र प्रत्यक्ष अद्यापही कामाला सुरुवात झालेली नाही.
महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, खडकवासला धरण साखळी परिसरात मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये पाणी वाढत आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा विसर्ग वाढल्याने एकतानगरी सोसायटीच्या पार्किंगमध्ये पुराचे पाणी शिरले. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचे स्थलांतर केले जात आहे. नागरिकांची राहण्याची व्यवस्था महापालिकेकडून तीन ठिकाणी करण्यात आली आहे.
