पुणे : जिल्ह्यातील १५८ मंडळांपैकी ६४ मंडळांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांत अनेक ठिकाणी रस्ते खचल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. तसेच, काही ठिकाणी किरकोळ पडझडही झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यात पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, १० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

पुणे शहर, हवेली, मुळशी, भोर, मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि शिरूर या तालुक्यांत बुधवारी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. शहरातील बोपोडी येथील हॅरिस ब्रीज तसेच शिवणे येथील नांदेड सिटी ते शिवणे जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

मुळशी तालुक्यातील मांदेडे-माळवाडी पूर, पुणे-कोलाड-माणगाव रस्ता, भोर तालुक्यातील कुडली बुद्रुक ते दुर्गाडी रिंग रोड, दीडघर ते हातवे रस्ता, केळवडे ते साळवडे रस्ता, आशिंपी गावागडे जाणारा रस्ता, मळे-महादेववाडी रस्ता, हिरडोशी ते वारवंड रस्ता, मावळ तालुक्यातील रस्ते खचले. काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्यामुळे आणि दरड कोसळून माती रस्त्यावर आल्यामुळे रस्ते बंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. मावळ, वेल्हा, जुन्नर, खेड, आंबेगाव आणि लोणी काळभोर येथील काही रस्तेही पावसामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.

दहा हजार नागरिकांचे स्थलांतर

पुणे, हवेली, मुळशी, भोर, मावळ, जुन्नर, आंबेगाव, चिंचवड, लोणीकाळभोर येथील एकूण १० हजार २७१ नागरिकांचे ५४ ठिकाणी स्थलांतर करण्यात आले. भोर तालुक्यातील पान्हवळ येथील आनंदा मारूती कोंढाळकर हा वृद्ध ओढ्यामध्ये पडला असून, शोधकार्य सुरू आहे. अपर लोणीकाळभोर येथील आष्पारू येथेही एक व्यक्ती पाण्यात वाहून गेला. मावळ तालुक्यातील खंडाळा गावात पुथेपू गंगाराम ही व्यक्ती दरड कोसळल्यामुळे तर, निगडे गावातील रामदास सखाराम ठाकर ही व्यक्ती पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात आले.