पुणे : खासगी कंपनीची बस साचलेल्या पाण्यात अडकल्याची घटना वाघोली-लोहगाव रस्त्यावर मंगळवारी सकाळी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या बसमधील सहा कर्मचाऱ्यांची सुटका केली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली.

शहर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोहगाव-वाघोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणवर साचले होते. पावसामुळे पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. त्या वेळी लोहगाव-वाघोली रस्त्यावरुन निघालेल्या बस चालकाने पाण्यात बस नेली. पाण्यात बस अडकली. पाण्यातून मार्ग काढता न आल्याने बस चालक गोंधळला. बसमधील कर्मचारी घाबरले. रस्त्यावर साधारणपणे चार ते पाच फूट पाणी साचल्याने बस चालकासह कर्मचाऱ्यांना बसमधून बाहेर पडता येणे शक्य नव्हते. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली.

पुणे महापालिका, तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी प्रसंगावधान राखून पाण्यात अडकलेल्या बस चालकासह कर्मचाऱ्यांना दोराचा वापर करून बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात टेम्पो अडकल्याची सोमवारी दुपारी घडली. पाण्याच्या प्रवाहात टेम्पो वाहून जाताना बंदोबस्तास असलेल्या वाहतूक पोलिसांनी पाहिला. पोलिसांनी या वेळी दाखविलेल्या तत्परतेमुळे टेम्पोचालकाचे प्राण वाचले.

पोलिसांचे आवाहन

‘पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागांत पाणी साचले आहे. भुयारी मार्गात पाणी साचले असून, अशा परिस्थितीत साचलेल्या पाण्यात वाहनचालकांनी वाहने नेण्याचा प्रयत्न करू नये. ज्या भागात लोखंडी कठडे लावले आहेत. अशा भागात जाऊ नये. नागरिकांनी पोलीस आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे,’ असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.