scorecardresearch

पुणे : दक्षिण कोकणात मुसळधारा,इतरत्र पावसाचा जोर कमीच ; जून अखेरीस पुन्हा ऊन-सावल्यांचा खेळ

दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटक्षेत्रात तुरळक भागांत गेल्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पाऊस होत असला, तरी राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र पावसाचा जोर कमी आहे.

seasonal rains
(संग्रहीत छायाचित्र)

दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटक्षेत्रात तुरळक भागांत गेल्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पाऊस होत असला, तरी राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र पावसाचा जोर कमी आहे. जून महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर आणखी कमी होऊन पुन्हा ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होणार असल्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणच्या काही भागांत गेल्या चोवीस तासांत २५० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. या भागांत आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ईशान्ये कडील राज्यांमध्ये अतिरेकी पाऊस झाल्यानंतर सध्या मोसमी पावसाची उत्तरेकडील प्रगती थांबली आहे. सध्या मोसमी पाऊस राजस्थान आणि उत्तर प्रदेशपासून काही अंतरावर आहे. मध्य भारत आणि दक्षिण किनारपट्टीच्या भागामध्ये सध्या काही प्रमाणात पाऊस होत आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन ते चार दिवसांपासून किनारपट्टीच्या भागामध्ये बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्याचा परिणाम म्हणून दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही भागांत मुसळधार पाऊस हजेरी लावतो आहे. या भागातून पश्चिम महाराष्ट्राच्या घाट विभागांमध्येही बाष्पाच्या पुरवठा होत असल्याने घाट विभागांत तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी आहे. मुंबई, ठाण्यासह उर्वरित कोकण विभागाच्या भागात मात्र तुरळक ठिकाणीच हलका पाऊस आहे.

उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची हजेरी असली, तरी मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांत केवळ हलका पाऊस होतो आहे. मराठवाड्यात सर्वच ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे. विदर्भात बुलढाणा, ब्रह्मपुरी आदी भागांत तुरळक पावसाची नोंद होत आहे. दक्षिण कोकणात आणखी पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी असतील. त्याचप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भात काही भागांतच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मात्र, बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.

चोवीस तासांत २७० मिलिमीटर
रत्नागिरी जिल्ह्यांतील लांजा येथे गेल्या चोवीस तासांत २७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरीत २२०, तर श्रीवर्धन येथे २०० मिलिमीटर पाऊस पडला. हकणाई, दापोली, कणकवली, गुहागर आदी भागांत १६० ते २५० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. संगमेश्वर, देवरूख, कुडाळ, पेडणे, सावंतवाडी, वेंगुर्ला आदी भागांत ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा, चंदगड येथे ६० ते ७० मिलिमीटर, तर मराठवाड्यातील मुखेड येथे ७० मिलिमीटर पाऊस नोंदिवला गेला. विदर्भातील केल्हार, लाखनी, देवरी आदी भागांत २० ते ३० मिलिमीटर पाऊस झाला.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune heavy rains south konkan low rainfall june heat summer pune print news amy