पुणे : हिंजवडी मेट्रो सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर आता ‘आयटीयन्स’ना आणखी एक खुशखबर मिळाली आहे. ‘आयटी पार्क’ परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपुलांचे जाळे उभारण्यात येणार आहे. याचबरोबर समतल विलगक उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे ‘आयटी पार्क’मधील वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. या प्रकल्पांचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला असून, या कामाला लवकरच गती मिळण्याची चिन्हे आहेत.

‘आयटी पार्क’ परिसरात सर्वाधिक कोंडी होणाऱ्या लक्ष्मी चौक, विनोदेनगर चौक आणि गुरूकृपा हॉस्पिटल चौक या तीन ठिकाणी उपाययोजनांचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. या आराखड्यानुसार, लक्ष्मी चौकातील उड्डाणूपल ८५० मीटर लांबीचा असेल. तो भूमकर चौकाच्या बाजूने सुरू होऊन हिंजवडी टप्पा क्रमांक दोनच्या बाजूला जाईल. तसेच, त्याची एक बाजू मारूंजीच्या बाजूला २६० मीटर अंतरावर उतरेल. या ठिकाणी भूमकर चौक ते हिंजवडी टप्पा क्रमांक दोनदरम्यान ५२० मीटरचे सेवा रस्ते असतील. याचबरोबर लक्ष्मी चौकात ५२० मीटर लांबीचा समतल विलगक उभारण्यात येणार आहे. हिंजवडी टप्पा क्रमांक दोनपासून विनोदेनगर चौकापर्यंत हा दुपदरी समतल विलगक असेल.

विनोदेनगर चौकातील उड्डाणपूल ५९० मीटर लांबीचा असेल. तो लक्ष्मी चौकाच्या बाजूने सुरू होऊन भूमकर चौकाच्या बाजूला जाईल. हा उड्डाणपूल चारपदरी असणार आहे. या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला लक्ष्मी चौक ते भूमकर चौक सेवा रस्ते आणि पदपथ असतील. गुरूकृपा चौकातील उड्डाणपूल ७४० मीटर लांबीचा चारपदरी असेल. तो लक्ष्मी चौकाच्या बाजूने सुरू होऊन मारुंजीच्या बाजूला जाईल. याचबरोबर हिंजवडी टप्पा क्रमांक दोन ते मारुंजी सेवा रस्ते आणि पदपथ असतील, असे सार्वजनिक विभागाने म्हटले आहे.

लवकरच निर्णय अपेक्षित

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील लक्ष्मी चौक, विनोदेनगर चौक आणि गुरूकृपा हॉस्पिटल चौक अशा तीन ठिकाणच्या प्रकल्पांचा आराखडा हा खर्चाच्या अंदाजासह तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीबाबत राज्य सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी दिली.

आयटी पार्क परिसरातील प्रकल्प

लक्ष्मी चौक – भूमकर चौक ते हिंजवडी टप्पा क्रमांक दोन उड्डाणपूल
खर्च – ७६.१ कोटी रुपये

लक्ष्मी चौक- हिंजवडी टप्पा क्रमांक दोन ते विनोदेनगर चौक समतल विलगक
खर्च – २१.१ कोटी रुपये

विनोदेनगर चौक – लक्ष्मी चौक ते भूमकर चौक उड्डाणपूल
खर्च – ६४.५ कोटी रुपये

गुरूकृपा हॉस्पिटल चौक – लक्ष्मी चौक ते मारुंजी
खर्च – ६६.२ कोटी रुपये