पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट बनली आहे. ‘अनक्लॉग हिंजवडी आयटी पार्क’ या आयटी कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणातून सर्वाधिक कोंडीची १० ठिकाणे समोर आली असून तिथे आयटीयन्स दररोज तासनतास अडकून पडत आहेत. विशेष म्हणजे, आयटी पार्कमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा वापर नगण्य असून, खासगी मोटारी आणि दुचाकीचा वापर सर्वाधिक होत असल्याचे वास्तवही या सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

आयटी पार्कमधील वाहतूककोंडीसह पायाभूत सुविधांची समस्या सोडविण्यासाठी गेल्या वर्षी ‘अनक्लॉग हिंजवडी आयटी पार्क’ ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेनंतर वर्षभरात काय घडले याचा आढावा सर्वेक्षणाद्वारे आता घेण्यात आला आहे. सर्वेक्षणात आयटी कर्मचाऱ्यांना आयटी पार्क परिसरातील सर्वाधिक कोंडीची ठिकाणे विचारण्यात आली होती. त्याचबरोबर दैनंदिन प्रवासात सर्वाधिक अडचणी कोणत्या येतात, याबद्दलही आयटी कर्मचाऱ्यांना विचारण्यात आले होते. त्यात बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांसाठी सुरक्षित जागा नसल्याचे म्हटले आहे. याच वेळी रस्त्यांवरील अतिक्रमण, पदपथ नसणे, अरुंद रस्ते, अपुरे वाहनतळ, सिग्नलच्या वेळा, शेवटच्या टप्प्यातील वाहतुकीचा पर्याय नसणे या समस्यांकडे कर्मचाऱ्यांनी बोट दाखविले आहे.

आयटी कर्मचाऱ्यांकडून कोणत्या प्रवासी वाहनांचा वापर केला जातो, असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. त्यात बहुसंख्य कर्मचारी हे स्वत:च्या मोटारीचा वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्या खालोखाल दुचाकीधारक कर्मचाऱ्यांचे प्रमाण आहे. कॅब आणि कंपनी बसने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. विशेष म्हणजे, अनेक कर्मचारी सायकलने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. पीएमपीने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण मात्र नगण्य आहे.

तातडीने उपाययोजनांची गरज

गेल्या वर्षी हिंजवडी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांची समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली होती. त्यानंतर वर्षभरात प्रशासकीय यंत्रणेकडून कोणतेही काम पूर्ण झालेले नाही. आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था कायम आहे. सरकारी अधिकारी केवळ वेळकाढूपणा करीत आहेत. त्यामुळे सरकारनेच आता आयटी पार्कमधील परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी ‘अनक्लॉग हिंजवडी आयटी पार्क’ मोहिमेचे संयोजक सचिन लोंढे यांनी केली.

सर्वाधिक कोंडीची १० ठिकाणे

१) लक्ष्मी चौक
२) विप्रो सर्कल
३) भूमकर चौक
४) वाकड पूल
५) हिंजवडी पूल
६) माण रस्ता
७) फेज १ सर्कल
८) इन्फोसिस सर्कल
९) फेज २
१०) मारुंजी