पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क परिसरात काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवास सुकर होणार आहे. मेट्रो स्थानकातून थेट कार्यालयात जाण्याची सुविधा आयटी कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पुढाकार घेतला असून, सध्या आयटी पार्कमध्ये पाच कंपन्यांकडून असा पादचारी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आयटी कर्मचाऱ्यांसह पुणेकरांचा प्रवास या मेट्रो सेवेमुळे वेगवान होणार असून, त्यांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील मेट्रो मार्गावरील कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नजीकच्या मेट्रो स्थानकातून पादचारी उड्डाणपूल उभारावा, असा प्रस्ताव ‘एमआयडीसी’ने दिला आहे. या पादचारी उड्डाणपुलांमध्ये मेट्रो स्थानकातून कर्मचाऱ्यांना खाली रस्त्यावर उतरून कंपनीपर्यंत जाण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांना स्थानकातून थेट कंपनीत जाता येईल आणि कंपनीतून थेट स्थानकात येता येईल. मेट्रो मार्गावरील सर्व मोठ्या आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांसाठी पादचारी उड्डाणपूल उभारावेत, यासाठी ‘एमआयडीसी’चे प्रयत्न सुरू आहेत. या पादचारी उड्डाणपुलासाठी जागा ‘एमआयडीसी’कडून उपलब्ध करून दिली जाणार आहे.

‘मेट्रो स्थानकापासून पादचारी उड्डाणपूल उभारण्याच्या ‘एमआयडीसी’च्या प्रस्तावाला इन्फोसिस आणि एम्बसी क्वाड्रन बिझनेस पार्कने होकार दर्शविला आहे. इन्फोसिस कंपनीकडून मेट्रो स्थानक चार व पाचला जोडणारे पादचारी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. त्याच वेळी एम्बसी क्वाड्रन बिझनेस पार्ककडून मेट्रो स्थानक दोनला जोडणारा पादचारी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. ‘एमआयडीसी’ने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), टेक महिंद्रा, बिर्लासॉफ्ट या कंपन्यांनाही अशा प्रकारचा प्रस्ताव दिला आहे. आयटी पार्कमधील कंपन्यांनी मेट्रो स्थानकापासून पादचारी उड्डाणपूल उभारल्यास सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे,’ अशी माहिती ‘एमआयडीसी’चे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला यांनी दिली.

रस्त्यावरील गर्दी कमी होणार

आयटी कर्मचाऱ्यांना मेट्रो स्थानकातून थेट कंपनीत जाता-येता यावे, यासाठी पादचारी उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. याला अनेक कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे कर्मचारी घरून मेट्रोतून येतील आणि स्थानकातून थेट कंपनीत जातील. याचबरोबर घरी जातानाही ते कंपनीतून थेट स्थानकात जातील. या माध्यमातून कर्मचाऱ्यांची सोय होणार असून, रस्त्यावरील गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. आयटी पार्कमधील सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होईल, असे ‘एमआयडीसी’चे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला यांनी सांगितले.

मेट्रो पादचारी उड्डाणपुलाचा प्रस्ताव

कंपनी – कर्मचारी संख्या

इन्फोसिस – ३० हजार

एम्बसी क्वाड्रन बिझनेस पार्क – २५ हजार

टीसीएस, टेक महिंद्रा – १० हजार

बिर्लासॉफ्ट – ५ हजार

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो

पहिला टप्पा – माण ते बालेवाडी
स्थानके – १ ते १२

अंतर – १३.३ किलोमीटर
सुरूवात – सप्टेंबरचा पहिला आठवडा

दुसरा टप्पा – बालेवाडी हाय स्ट्रीट ते शिवाजीनगर
स्थानके – ११

अंतर – १० किलोमीटर
सुरुवात – डिसेंबरपर्यंत