पुणे : माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्याचा मुहूर्त पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महिनाभर लांबणीवर पडला होता. आता या सेवेचे पुढील महिन्याच्या सुरुवातीला दिवाळीआधी उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर येणार असून, त्या वेळी त्यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा कंदील दाखविला जाण्याची शक्यता आहे.

हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या या पुणेरी मेट्रोची सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा पुणेकरांसह आयटी कर्मचाऱ्यांना आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) स्थानक या १२ स्थानकांदरम्यानच्या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यास २३ जुलैला मंजुरी दिली. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुरुवातीला १२ स्थानकांदरम्यान सेवा सुरू करण्याचे नियोजन केले होते. नंतर आणखी पाच स्थानकांचे काम पूर्ण होऊन त्यांची तपासणी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पूर्ण झाली. या पाच स्थानकांवरील सेवेलाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण मेट्रो मार्गावर सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील मिळाला आहे.

मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्याविषयी ‘पीएमआरडीए’ने राज्य सरकारला पत्र लिहिले होते. राज्य सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन करण्यात आले. मात्र, पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा सप्टेंबरमध्ये झाली. त्यामुळे आचारसंहिता लागू झाली असून, ती २७ ऑक्टोबरपर्यंत आहे. या काळात मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सरकारला करता येणार नाही. त्यामुळे आता मेट्रो सेवेचे उद्घाटन ३ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्यावेळी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

डिसेंबरपर्यंत उर्वरित स्थानकांची कामे

‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गावरील १७ स्थानकांवरील सेवेला मंजुरी मिळालेली आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मार्गावरील उर्वरित सहा स्थानकांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील वर्षी या मार्गावरील सर्व स्थानकांवरील सेवा सुरू होईल,’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.

सेवा सुरू होणारी स्थानके

माण, एमआयडीसी सर्कल, माण बस डेपो, हिंजवडी फेज-२ सर्कल २, हिंजवडी फेज-२ सर्कल १, पद्मभूषण चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी फेज-१, वाकड चौक, शिवछत्रपती क्रीडा संकुल (म्हाळुंगे), मिटकॉन बालेवाडी, आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी), औंध, सकाळनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, जिल्हा न्यायालय या १७ स्थानकांवरील सेवा या महिन्यात सुरू होणार आहे. त्यानंतर बालेवाडी हाय स्ट्रीट, बालेवाडी फाटा, बाणेरगाव, बाणेर-पाषाण लिंक रोड, भोसलेनगर आणि शिवाजीनगर ही स्थानके येत्या डिसेंबरपर्यंत सुरू होतील.

पुणेरी मेट्रो

माण ते जिल्हा न्यायालय

  • एकूण लांबी – २३.३ किलोमीटर
  • एकूण स्थानके – २३
  • सेवा सुरू होणारी स्थानके – १७
  • सेवा सुरू – ३ नोव्हेंबर