पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्याची प्रतीक्षाच असून, आता या सेवेसाठी नवीन मुहूर्त काढण्यात आला आहे. ही सेवा जुलैच्या अखेरीस अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मेट्रोमुळे आयटी कर्मचाऱ्यांसह लाखो पुणेकरांचा प्रवास सुकर होणार आहे. परंतु, ही सेवा सुरू होत नसल्याने त्यांची वाहतूक कोंडीतून लवकर सुटका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणारी ही पुण्यातील तिसरी मेट्रो मार्गिका आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड कंपनीसमवेत राबविण्यात येत आहे. ही सेवा गेल्या वर्षी मार्च महिन्यात सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, कामे अपूर्ण असल्याने ती सुरू झाली नाही. त्यानंतर अनेक मुहूर्त जाहीर करण्यात आले; परंतु गेल्या सव्वा वर्षात ही सेवा सुरू होऊ शकली नाही.
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्चमध्ये पुण्यात एका कार्यक्रमात या मेट्रोचा पहिला टप्पा मे महिन्यात आणि दुसरा टप्पा जुलैमध्ये सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तेही फोल ठरले. त्यानंतर मेट्रो सेवेचा पहिला टप्पा १५ जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. आता हे नियोजनही कोलमडले असून, ही सेवा जुलैच्या अखेरीस अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे नवीन नियोजन करण्यात आले आहे.
प्रकल्प खर्चात २० टक्के वाढ
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील सर्व स्थानकांवर सेवा सुरू होण्यास पुढील वर्षीचा मार्च महिना उजाडणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यास मुदतीपेक्षा एक वर्षांहून अधिक काळ लागल्याने एकूण खर्चात सुमारे २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा खर्चाचा बोजा पुणे आयटी सिटी मेट्रो रेल (पीआयटीसीएमआरएल) कंपनी उचलणार आहे. गणेश खिंड रस्त्यावर मेट्रोचे काम करण्यास विलंब लागल्याने हा प्रकल्प रखडल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाची तपासणी मेट्रो रेल्व सुरक्षा आयुक्तांकडून पूर्ण झाली आहे. या मार्गावरील सेवा सुरू करण्यासाठी मंजुरी मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो. ही मंजुरी मिळाल्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस अथवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. – डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त, पीएमआरडीए
मेट्रो सेवा सुरू करण्याचे मुहूर्त
१) मार्च २०२५
२) सप्टेंबर २०२५
३) डिसेंबर २०२५
४) मार्च २०२६
५) मे २०२६
७) १५ जून २०२६
८) १५ जुलै २०२६
९) जुलैअखेरीस अथवा ऑगस्टचा पहिला आठवडा
मेट्रोचा पहिला टप्पा
माण ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बाणेर)
स्थानके – १२
लांबी – १३.३ किलोमीटर
सुरू होणे अपेक्षित – जुलैअखेरीस अथवा ऑगस्टचा पहिला आठवडा
मेट्रोचा दुसरा टप्पा
बालेवाडी हायस्ट्रीट ते जिल्हा न्यायालय
स्थानके – ११
लांबी – १० किलोमीटर
काम पूर्ण होणे अपेक्षित – ऑगस्ट
