पुणे : विषारी दारू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला. ‘सीआयडी’कडून या प्रकणाचा सखोल तपास करण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहे.
विषारी दारू प्याल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील १९ जणांचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर उत्पादन शुल्क विभाग, पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपास सुरू केला. वेगवेगळ्या भागात छापे टाकून चार हजार लिटर गावठी दारू, तसेच चार हजार लिटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे याच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास शुक्रवारी (२९ मे) रात्री उशीरा ‘सीआयडी’ सोपविण्यात आला.
‘ या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ‘सीआयडी’ने पाच पथके तयार केली असून, तपासाची धुरा वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आली आहे. तपासाच्या अनुषंगाने पुणे, पिंपरी पोलीस, तसेच उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांकडून शनिवारी माहिती घेण्यात आली’, अशी माहिती ‘सीआयडी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
विषारी दारू प्रकरणात दापोडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘सीआयडी’च्या पथकाने पिंपरीतील फुगेवाडी, दापोडी, तसेच शिवाजीनगरमधील वडारवाडी, हडपसमधील पांढरे मळा परिसारतील गावठी दारू अड्ड्यांना भेट दिली. या भागातील नागरिकांकडून माहिती घेण्यात आली. ‘सीआयडी’चे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामाानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके तपास करत आहेत.
विषारी दारू प्रकरणाचा सूत्रधार वानखेडेने कोण ?
विषारी दारू प्रकरणाचा मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे याने गावठी दारू प्रकरणात ओळख लपविण्यासाठी सिंकदर राठोड हे नाव वापरले होते. कारवाईपासून वाचण्यासाठी तो बनावट नावाने वावरत होता. वानखडे मूळचा सोलापूर जिल्ह्यातील वेलाटी लमाण तांडा येतील आहे. रोजगारासाठी तो पुण्यात आला होता. सुरुवातीला तो लोणी काळभोर परिसरातील कुंजीरवाडी, घोरपडी गाव भागात राहत होता. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून तो मुंढव्यातील केशवनगर भागात एका सोसायटीत आई-वडिलांसह राहत आहे. विषारी दारू प्रकरणाचा वानखेडे हा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो गावठी दारू विक्रीत सामील होता. ऊरळी कांचनमधील राजू प्रजापती उर्फ राधेश्याम गोयल याच्याकडून तो गावठी दारू खरेदी करत होता. ३५ लिटर प्लास्टिक कॅन तो १७०० ते १८०० रुपयांना खरेदी करत होता. त्यानंतर गावठी दारूचा पुरवठा तो पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वस्ती भागात करत होता.
गावठी दारूत ‘मिथेनाॅल’चा बिहार आसाममध्ये वापर
विषारी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार वानखेडे हा काही महिन्यांपूर्वी एका विवाह समारंभाासाठी बिहारला गेला होता. त्या वेळी बिहारमध्ये मोहाच्या फुलांपासून तयार करण्यात आलेल्या दारूत ‘मिथेनाॅल’चा वापर करत असल्याची माहिती त्याला मिळाली. गावठी दारूत ‘मिथेनाॅल’ मिश्रीत केल्यानंतर जास्त नशा येते, अशी माहिती त्याला मिळाली. बिहार, आसाममधील दारू विक्रेत्यांनी त्याला ही माहिती दिली होती. दोन महिन्यांपूर्वी त्याने समाज माध्यमात मिथेनाॅलची माहिती मिळवली. मुंबईतील एका कंपनीशी त्यांना संपर्क साधला. संबंधित कंपनीने त्याला ‘जीएसटी’ क्रमांकाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने अत्तर तयार करण्यासाठी ‘मिथेनाॅल’चा वापर करणार असल्याचे त्याने मुंबईतील कंपनीतील सांगितले. मुंबईतील कंपनीने २८ एप्रिल रोजी त्याला पैसे पाठविण्यास सांगितले. त्याने वडारवाडीतील आर्यन धोत्रे याला २५ हजार रुपये दिले होते. त्यापैकी १७ हजार ५०० रुपये त्याने संबंधित कंपनीला पाठवून दिले. त्यानंतर ९ मे रोजी भोसरी येथील एका कंपनीकडून त्याने ‘मिथेनाॅल’ मिळवले. त्याने मिथेनाॅल खडकी भागात राहणाऱ्या ओळखीतील एकाच्या गोदामात ठेवले. त्यानंतर तो भावाच्या विवाहानिमित्त सोलापूरला गेला.
आग लावून गावठी दारूची तपासणी
वानखेडे याने २२ मे रोजी ऊरळी कांचनमधील गावठी दारू तयार करणारा राजू प्रजापती याच्याकडून पाच कॅन खरेदी केले. या प्लास्टिक कॅनमध्ये त्याने पाणी मिसळले. दहा कॅन घेऊन तो खडकीतील गोदामात गेला. तेथे ठेवलेले ‘मिथेनाॅल’ त्याने गावठी दारूत मिसळले. त्यानंतर गावठी दारू कडक झाली अहो का हे तपासण्यासाठी काडीपेटीने तपासणी केली. जळती काडी टाकल्यानंतर मिथेनाॅल मिश्रीत गावठी दारूने पेट घेतला. त्यानंतर पहाटे दारूचे कॅन घेऊन फुगेवाडीतील कर्नलसिंह विरका, दापोडीतील इरफान उर्फ पप्पू कुरेशी, हडपसरमधील आकाश जाधव, वडारवाडीतील आर्यन धोत्रे याच्या दारू अड्ड्यावर दिले, अशी माहिती तपासात मिळाली आहे. विषारी दारू प्रकरण उघडकीस आल्यानंतर वानखेडेने ९० लिटर मिथेनाॅल ओतून दिले.
