पुणे : विषारी दारू प्रकरणात रसायने पुरविणाऱ्या दोघांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) नवी मुंबईतून दोघांना अटक केली. आरोपींना न्यायालयाने चार दिवस पाेलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

अरुण जगदंब चौबे (वय ५९), अभिषेक अरुण चौबे (वय २४, दोघे रा. वाशी, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. विषारी दारू प्रकरणात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील २२ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुख्य सूत्रधार योगेश वानखेडे याच्यासह साथीदारांना अटक करण्यात आली. विषारी दारू प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे सोपविण्यात आला आहे. विषारी दारू तयार करण्यासाठी चौबे यांनी घातक रसायने पुरविल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर ‘सीआयडी’च्या विशेष पथकाने दोघांना नवी मुंबईतून ताब्यात घेतले. दोघांना अटक केल्यानंतर पिंपरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालायात हजर करण्यात आले. न्यायालायने देाघांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक शफाकत अमान यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शामराव काळे, सचिन चव्हाण आणि पथकाने ही कारवाई केली. विषारी दारू प्रकरणाचा तपासात नागरिकांना काही महिती असल्यास त्वरीत सीआयडीतील अधिकारी शामराव काळे (मोबाइल क्रमांक – ८२३७२२९२०८) आणि सचिन चव्हाण (मोबाइल क्रमांक – ९०११३३४५८०)यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.