पुणे : विषारी दारू प्रकरणाच्या तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) दहा पथकांची स्थपना केली आहे. या प्रकणाच्या सखोल तपासासाठी पथकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.

मुख्य सूत्रधार योगेश वानखेडेला मिथेनाॅलचा पुरवठा करणाऱ्या दोन संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. मिथेनाॅल पुरवठा करणाऱ्या संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विषारी दारू प्रकरणात पिंपरी-चिंचवड शहर, तसेच पुणे शहरातील एकूण २२ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा तपास ‘सीआयडी’कडे सोपविण्यात आला आहे. सुरुवातीला या प्रकरणाच्या तपासासाठी पाच विशेष पथकांची स्थापना करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाची व्याप्ती विचारात घेऊन पथकांच्या संख्येत वाढ करण्यात आली असून, त्यानुसार आता दहा विशेष पथकांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

तपासात ‘सीआयडी’च्या पथकाने सीसीटीव्ही चित्रीकरण, दारूचे नमुने जप्त करण्यात आले आहे. हे नमुने न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती ‘सीआयडी’तील अधिकाऱ्यांनी दिली.

‘पोलीस, उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना आरोपी करा’

‘हडपसरमधील गावठी दारू विक्री अड्ड्याची शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) स्थानिक नगरसेवकांनी पोलिसांना माहिती यापूर्वी दिली होती. पोलिसांनी कारवाई केली नाही. स्थानक पोलीस, तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली. पोलीस, तसेच उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना या प्रकरणात सहआरोपी करावे,’ अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. दानवे यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. या वेळी आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, शहरप्रमुख वसंत मोरे, सहसंपर्क प्रमुख संजय मोरे, गटनेते नगरसेवक नितीन गावडे, महादेव बाबर उपस्थित होते. ‘अधिकाऱ्यांना निलंबित करुन चालणार नाही. त्यांना सहआरोपी करण्यात यावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह विभागाचे मुख्य सचिवांशी भेट घेणार आहोत’, असे त्यांनी सांगितले.