पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विषारी दारू प्यायल्याने २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मिश्रित गावठी दारू (हातभट्टी) विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई तीव्र केली. आठवडाभरात शहरातील वेगवेगळ्या भागांत छापे टाकून गावठी दारू, रसायने असा दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उत्पादन शुल्क विभागाने १४२ गुन्हे दाखल करून ११६ गावठी दारू विक्रेत्यांना अटक केली.
विषारी दारू प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील गावठी दारू अड्ड्यांवर छापे टाकले. २९ मे ते ४ जून या कालावधीत १४२ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत एक कोटी ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय आयुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत आठ हजार ४७२ लिटर गावठी दारू, दारू निमिर्तीसाठी लागणारे ६९ हजार २७१ लिटर रसायन जागीच नष्ट करण्यात आले. परराज्यातील मद्य, बनावट मद्य जप्त करण्यात आले. दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ११ वाहने जप्त करण्यात आली. विषारी दारू प्रकरणानंतर गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आहेत. गावठी दारू विक्रेत्यांना कच्चा माल पुरविणाऱ्यांना आरोपी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार दारू विक्री प्रकरणात चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्यासाठी (पर्सनल बाँड) १२५ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.
विषारी दारू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा तपास ‘सीआयडी’शी समन्वय साधून करण्यात येत आहे.
विषारी दारू प्रकरणात जनजागृती
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला विषारी दारूच्या दुष्परिणामांबाबत जगजागृती करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. गावठी दारू विक्रेत्यांच्या घरांवरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मिथेनाॅल पुरवठादारांची माहिती संकलित
मिथेनाॅलचा बेकायदा कामांसाठी वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) मिथेनाॅल पुरवठादारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. संशयास्पद व्यवहारांवर कारवाई करण्यात येणार आहे. गावठी दारू अड्ड्यावर वीजपुरवठा होत असल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
