पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) पुणे जिल्ह्यातील ज्या गावात गावठी दारू तयार केली जाते. अशी गावे निश्चित केली आहेत. उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील १८८ ग्रामपंचायतीना नाेटिसा बजावल्या आहेत. ‘गावाच्या परिसरातील बेकायदा गावठी दारू धंदे, दारू तयार करणाऱ्या सराइतांची माहिती उत्पादन शुल्क विभागाला द्यावी’, अशा सूचना नोटिशीद्वारे दिल्या आहेत.
‘उत्पादन शुल्क विभागाने पुणे शहरालगत असणारी गावे, तसेच जिल्ह्यातील गावांची यादी तयार केली आहे. या गावात बेकायदा गावठी (हातभट्टी) दारू तयार केली जाते. या गावातून शहर परिसरात दारू विक्रीस पाठविली जाते. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अशा गावांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतींनी त्यांच्या हद्दीत बेकायदा दारू चालून देऊ नये, अशा प्रकारचे गैरप्रकार करणाऱ्यांची माहिती उत्पादन शुल्क विभाग, तसेच पोलिसांनी द्यावी,’ असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे कार्यालयातील अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराजवळ असलेल्या गावात भट्ट्या पेटवून गावठी दारू तयार केली जाते. गावातील निर्जन भाग, तसेच शासकीय जमिनींच्या परिसरातील झाडीत दारूभट्ट्या उभ्या केल्या जातात. या भागात नागरिकांचा फारसा वावर नसतो, असे दिसून आले आहे. पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी, कुंजीरवाडी, नांदूर, (पुणे-सोलापूर रस्ता) राजेवाडी, भोसलेवाडी, आपटी (शिररु) या गावांसह १८८ गावांतील ग्रामपंचायतींना नोटिसा बजाविण्यात आल्या आहे.
ग्रामस्थांना धमक्या
‘बेकायदा दारूधंद्याची माहिती पोलिसांना देणाऱ्या नागरिकांना गावठी दारू तयार करणारे सराईत धमकावितात. दारू तयार करणाऱ्या सराइतांना काही ‘प्रभावशाली’ व्यक्तींचे पाठबळ असते. त्यामुळे नागरिक आणि ग्रामपंतायत सदस्य उघडपणे तक्रार करण्यास घाबरतात’, अशी तक्रार पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या एका गावातील ग्रामपंचायत सदस्याने केली.
विषारी दारू प्रकरणातील तिघांना उपचारानंतर सोडले
पुण्यातील हडपसर, तसेच पिंपरी-चिंचवडमधील २२ जणांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला होता. पिंपरीतील फुगेवाडीतील तिघांना उपचारांसाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे.
