पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू लोंढे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ऊरळी कांचन परिसरात बुधवारी सायंकाळी पाठलाग करुन पकडले.
विषारी दारू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली. आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. विषारी दारू प्रकरणात आणखी २० आरोपी सामील असल्याचा संशय आहे. त्यांचा शोध सीआयडीकडून घेण्यात येत आहे.
पुण्यातील हडपसर, तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्याल्यानंतर २२ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू लोंढे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला होता. तो पोलिसांना गुंगारा देत होता. पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर, ऊरळी कांचन परिसरात तो वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी ऊरळी कांचन परिसरात सापळा लावला. पोलिसांना पाहताच तो पळाला. पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले. लोंढे याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर विषारी दारू प्रकरणात महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने त्याच्याकडे तपास करण्यात येणार आहे.
पोलिसांपासून वाचण्यासाठी वेषांतर
आरोपी बाळू लोंढे याला पकडण्यासाठी ऊरळी कांचन पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ताब्यात घेतले. लोंढे याने पोलिसांपासून वेषांतर केले होते. लोंढे याने ओळख लपविण्यासाठी दाढी-मिशा कापल्या होत्या. मळकट कपडे त्याने परिधान केले होते.
