पुणे : विषारी दारू प्याल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात २० जणांचे बळी गेल्यानंतर शहरात गावठी दारू विक्री छु्प्या पद्धतीने सुरू असल्याचे उघडकीस आले. कोंढव्यातील येवलेवाडीत पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी रसायन मिश्रित गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गु्न्हा दाखल केला.

या प्रकरणी सुनील राजा सिंग (वय २५, रा. दगडे वस्ती, पिसोळी), तसेच दिनेश मखनावत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई विजय खेंगरे यांनी येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर पिसोळी परिसरात मोकळ्या मैदानात भेसळयुक्त गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. शनिवारी (३० मे) पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी भेसळयुक्त गावठी दारू जप्त केली. या दारूत रसायनाचे मिश्रण केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

नशेसाठी रसायनांचा वापर

पिंपरीतील फुगेवाडी, दापोडी, तसेच पुण्यातील हडपसर परिसरात विषारी दारू प्याल्याने २० जणांचे मृत्यू झाले. विषारी दारूमुळे १९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात पडसाद उमटले. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार योगेेश वानखेडे याच्यासह साथीदारांना अटक केली. राजू प्रजापती याच्याकडून वानखेडे याने गावठी दारू (हातभट्टी )खरेदी केली हाेती. या दारूत वानखेडे याने ‘मिथेनाॅल’ मिसळले होते. जादा नशा यावी, यासाठी त्याने ‘मिथेनाॅल’चा वापर केला होता. येवलेवाडी पोलिसांनी शनिवारी पिसोळी परिसरातून गावठी दारू जप्त केली. या दारूत रसायन मिसळ्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विषारी दारू प्रकरणात अणखी एकाचा मृत्यू

हडपसरमधील पांढरे मळा परिसरातील चौघांचा विषारी दारू सेवन केल्यानंतर मृत्यू झाला. या घटनेनंतर याच भागातील एका तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. सचिन साेनवणे (वय ४२) असे मृ्तयुमुखी पडलेल्याचे नाव आहे. सोनवणे हा हडपसरमधील भाजी मंडईत मोलमजुरी करत होता. त्याच्या पत्नीचे निधन झाले आहे. सोनवणे याची मुलगी सातवीत शिक्षण घेत असून, ती आश्रम शाळेत शिक्षण घेत आहे. २७ मे रोजी सोनवणे या पांढरे मळा परिसरातील गावठी दारू अड्ड्यावर दारू प्याली. त्यानंतर शनिवारी रात्री सोनवणेला त्रास जाणवू लागला. पहाटे त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मारुती तुपे यांनी दिली. साेनवणे याची मुलगी सातवीत आहे. आई-वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

शिरूर परिसरात गावठी दारू अड्ड्यावर छापादारू विक्री प्रकरणात एकाला अटक

शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी परिसरात गावठी दारू अड्ड्यावर शिरूर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत ५०० लिटर रसायन, २०० लिटर गावठी दारू, मोटार असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

नीलेश गुलाब लोंढे (वय ३४, रा. शेळके वस्ती, निमगाव भोगी, ता. शिरुर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध शिरूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगाव भोगी गावातील शेळके वस्तीत लोंढे हा गावठी दारू विक्रीचा अड्डा चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर २९ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. तेथून गावठी दारू, दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन, अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईत ५०० लिटर रसायन, २०० लिटर गावठी दारू, मोटार असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी आरोपीविरुद्ध गावठी दारू विक्री प्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक महादेव वाघमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नीळकंठ तिडके, विलास आंबेकर, संतोष ओैटी, उमेश कुतवळ, योगेश गुंड, विद्या बनकर, किशोर शिवणकर, अमोल रासकर, अजित पवार, ज्ञानेश्वर शिंदे यांनी ही कारवाई केली. उपनिरीक्षक थोरात तपास करीत आहेत.