पुणे : शहरातील रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असूनही रुग्णांना वेळेवर माहिती मिळत नसल्याच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिका हद्दीतील सर्व खासगी; तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये खाटा, अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटरची अद्ययावत उपलब्धता दर्शविणारा ‘लाईव्ह डॅशबोर्ड’ दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही माहिती नागरिकांना मोबाईलवरही उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून, या बाबतची माहिती महापालिका आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी बुधवारी दिली.
पुणे महापालिका हद्दीत सध्या सुमारे १८० खासगी आणि २० महापालिकेची रुग्णालये कार्यरत आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये किती खाटा रिक्त आहेत, ‘आयसीयू’मध्ये किती जागा उपलब्ध आहेत, व्हेंटिलेटरच्या खाटा किती शिल्लक आहेत, याची माहिती नागरिकांना तातडीने मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची रुग्णालयागणिक होणारी धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे गेल्या काही दिवसांपासून विविध सामाजिक संस्था, नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्धतेबाबत तक्रारी येत आहेत. अनेकदा खाटा रिक्त असतानाही त्याची माहिती वेळेवर दिली जात नसल्याचा आरोप केला जातो. विशेषतः अतिदक्षता विभागात खाटा मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
आरोग्य विभागाकडे प्रत्येक तक्रारीची स्वतंत्र पडताळणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी महापालिकेचा माहिती व तंत्रज्ञान विभाग स्वतंत्र डिजिटल प्रणाली विकसित करीत आहे. प्रत्येक रुग्णालयाने दररोज आणि आवश्यकतेनुसार खाटा उपलब्धतेची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक राहणार आहे. ही माहिती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील डिजिटल डॅशबोर्डवर; तसेच मोबाईलवर पाहता येईल.
या प्रस्तावाबाबत पुढील दोन आठवड्यांत शहरातील सर्व रुग्णालय चालकांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. बैठकीत प्रणालीची कार्यपद्धती, माहिती अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी, तांत्रिक बाबी आणि नियमावली यावर चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर आवश्यक सुधारणा करून पुढील एक ते दोन महिन्यांत ही प्रणाली प्रत्यक्षात कार्यान्वित करण्याचा महापालिकेचा मानस आहे.
महापालिकेच्या मते, या उपक्रमामुळे रुग्णांना कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत याची माहिती घरबसल्या मिळेल. त्यामुळे उपचारांसाठी होणारा विलंब कमी होईल, रुग्णालयांमध्ये पारदर्शकता वाढेल आणि खाटा उपलब्धतेबाबत होणारा संभ्रमही दूर होण्यास मदत होईल.
डॅशबोर्डवर माहिती कोणती?
- एकूण उपलब्ध खाटा
- रिक्त खाटांची संख्या
- अतिदक्षता विभागातील खाटांची उपलब्धता
- व्हेंटिलेटरसाठी आवश्यक खाटांची उपलब्धता
- शेवटची माहिती अद्ययावत करण्यात आल्याची वेळ
- मोबाइलवरही ही माहिती उपलब्ध होणार
रुग्णांना रुग्णालयात खाटा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येतात , त्या पार्श्वभूमीवर महापालिका आरोग्य विभागाने सर्व महापालिका; तसेच खासगी रुग्णालयांना डॅशबोर्ड सक्तीचे करण्यात येणार आहे. येत्या एक ते दीड महिन्यात ही प्रणाली सर्व रुग्णालयांना सक्तीची करण्यात येणार असून, यामध्ये जर कोणत्या रुग्णालयांनी कुचराई केली, तर त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. – डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका
