पुणे: हडपसर येथील उषाकिरण रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात बुधवारी सायंकाळी बॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली. मात्र संभाव्य धोका ओळखून डॉ. विलास गायकवाड यांनी तो बॉम्ब तातडीने हाताने उचलून रुग्णालयाबाहेर नेला. त्यांच्या या साहसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्यामुळे संभाव्य अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.
या प्रकरणी उषाकिरण रुग्णालयाचे संस्थापक डॉ. विलास गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘त्या क्षणी मनात कोणतीही भीती नव्हती, फक्त रुग्णांचे प्राण वाचले पाहिजेत, एवढाच विचार होता. मात्र, अशी वस्तू रुग्णालयात सापडावी हीच अत्यंत चिंतेची बाब आहे. काही अनुचित घडले असते, तर अनेक रुग्णांच्या जिवावर बेतले असते. हा प्रकार कोणी केला या विषयी कुठलाही अंदाज बांधता येणे शक्य नाही. रुग्णालयातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत. गेल्या ४० वर्षांत कुठलाही अनुचित प्रकार रुग्णालयात घडला नाही. ‘उषाकिरण’ला का लक्ष्य केले गेले, हा प्रश्न आहे. या गोष्टीचा रुग्णसेवेवर कुठलाही परिणाम होणार नाही.’
या प्रकरणी डॉ. मंगेश विलास गायकवाड म्हणाले, ‘हडपसरमधील मध्यवर्ती भागात पुणे सोलापूर महामार्गाला लागूनच आमचे रुग्णालय आहे. घडलेल्या घटनेबाबत पोलीस तपास सुरू असून, कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य नाही. रुग्णालयात कालही रात्री रुग्ण तपासणीसाठी येत होते. आजही तपास सुरू असला, तरी कुठेही रुग्णांची गैरसोय होत नाही.’
