पुणे : पुण्यातील हॉटेल क्षेत्रात सध्या मोठी कामगार टंचाई निर्माण झाली आहे. कामगार नसल्याने हॉटेल चालवायची कशी, असा प्रश्न हॉटेलचालकांसमोर दररोज उपस्थित होत आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काही हॉटेलचालकांनी थेट विमानाने कामगारांना पुण्यात आणल्याच्या घटना घडल्या आहेत. यातून कामगार टंचाईचे भीषण वास्तव समोर आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील हॉटेल व्यवसाय अडचणीत आलेला आहे. आधी एलपीजी सिलिंडर टंचाई आणि त्यानंतर सुरू झालेला महागाईचा मारा यामुळे हा व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच काही राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे स्थलांतरित कामगार मूळ गावी परत गेले. यामुळे हॉटेलसाठी कामगार मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आपापल्यापरीने प्रत्येक हॉटेलचालक करीत आहे. काही हॉटेलचालकांनी मूळ गावी गेलेल्या स्थलांतरित कामगारांना तातडीने थेट विमानाने परत आणले आहे.
याबाबत पुणे रेस्टॉरंट अँड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार म्हणाले की, पश्चिम बंगालमधील कामगार पुण्यातील हॉटेल आणि केटरिंग व्यवसायात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. तेथील विधानसभा निवडणुकीसाठी हे कामगार मूळ गावी परत गेले होते. त्यामुळे कामगार टंचाई निर्माण झाली. ही निवडणूक संपल्यानंतर काही हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिकांनी विमानाने कामगारांना पुण्यात परत आणले. यातून या समस्येची तीव्रता लक्षात येते.
खाद्यपदार्थ २० टक्के महागले
पश्चिम आशियात युद्ध सुरू झाल्यापासून व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. त्यातच खाद्यतेलासह भाज्यांच्या किमती सातत्याने वाढत आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले असून, त्यांच्याकडून किमतीत २० टक्के वाढ झाली आहे. याचे चटके आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागले आहेत.
किमती वाढविण्यावर मर्यादा
हॉटेचालकांच्या खर्चात वाढ झाली असली, तरी खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ करण्यावर त्यांच्यासाठी मर्यादा आहेत. चपातीच्या किमतीत एका मर्यादेपर्यंत वाढ करता येते. त्या पलीकडे वाढ केल्यास ग्राहकाला ती परवडत नाही. असाच प्रकार अनेक खाद्यपदार्थांच्या बाबतीत आहे. त्यामुळे नफ्याचे प्रमाण कमी करून अथवा काही प्रमाणात नफा सोडून देऊन या खाद्यपदार्थांची विक्री करीत आहोत, अशी माहिती हॉटेलचालकांनी दिली.
विजेची भट्टी जुळेना
एलपीजी सिलिंडर टंचाई निर्माण झाल्याने अनेक हॉटेलचालकांनी विजेच्या शेगड्यांचा पर्याय निवडला. मात्र, एलपीजीपेक्षा विजेचा खर्च दुपटीने जास्त आहे. याचबरोबर सध्या वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. छोट्या हॉटेलचालकांनी जनित्राचा खर्च करणे परवडत नाही, त्यामुळे विजेचा पर्यायही सोयीचा नसल्याचे निरीक्षण नोंदविले.
