पुणे : व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आल्याने पुण्यातील हॉटेल आणि रेस्टॉरन्ट कधीही बंद होऊ शकतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक हॉटेलांनी खाद्यपदार्थांची संख्या कमी केली असून, पुढील २४ तासांत पुरवठा न झाल्यास मोठ्या प्रमाणात हॉटेल बंद होतील, असा इशारा हॉटेलचालकांनी दिला. हॉटेल, खानावळी बंद झाल्यास पुण्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह बाहेरून पुण्यात आलेल्या नोकरदारांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ शकतील.
आखातातील युद्धामुळे खनिज तेल व नैसर्गिक वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे देशभरात द्रवरूप पेट्रोलियम वाय़ूची (एलपीजी) टंचाई निर्माण झाली. या टंचाईवर तोडगा काढण्यासाठी सरकारने व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद केला आहे, तर घरगुती ग्राहकांना महिन्यातून एकदाच एलपीजी सिलिंडर देण्यास सुरुवात केली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर मिळत नसल्याने शहरातील हॉटेलचालक अडचणीत आले आहेत. हॉटेलचालकांकडे सर्वसाधारपणे दोन ते तीन दिवसांचा सिलिंडरचा साठा असतो. आता पुरवठाच बंद असल्याने पुढील २४ तासांत अनेक हॉटेल बंद होतील, असे हॉटेलचालकांचे म्हणणे आहे.
याबाबत पुणे रेस्टॉरंट अँड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोर सरपोतदार म्हणाले, ‘सध्या सिलिंडरचा साठा असलेल्या हॉटेलांकडून व्यवसाय सुरू ठेवण्यात येत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास या आठवड्यात बहुतांश हॉटेल बंद पडतील. अधिवेशन सुरू असल्यामुळे महत्त्वाचे राजकीय नेते या समस्येत लक्ष घालण्यास उपलब्ध नाहीत. किंबहुना यातून उद्भवणाऱ्या भयानक परिस्थितीची जाणीव त्यांना आलेली दिसत नाही. विद्यार्थी, नोकरदार आणि कामानिमित्त पुण्यात आलेले व्यापारी हे डायनिंग हॉल किंवा खानावळींवर अवलंबून असतात. त्यांचे आगामी काळात खूप हाल होऊ शकतील.’
काळाबाजार सुरू
‘अनेक हॉटेचालकांनी सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याकडे लक्ष वेधले. व्यावसायिक वापराचा सिलिंडर उपलब्ध असलेल्या व्यक्तींकडून तो दुपटीहून अधिक किमतीने विकला जात आहे. हॉटेल बंद होऊ नये, यासाठी सर्वांचीच धडपड सुरू असल्याने त्यांच्याकडून ही जास्त किंमतही दिली जात आहे. परंतु गॅसपुरवठा बंदच राहिल्यास ही धडपड फार काळ टिकणार नाही,’ अशी माहिती हॉटेलचालकांनी दिली.
डोसा, उत्तपा सर्वांत आधी बंद
‘हॉटेलचालकांनी गॅसच्या टंचाईमुळे खाद्यपदार्थांची संख्या कमी केली आहे. मात्र, पुरवठा बंद राहिल्यास किती दिवस हॉटेल सुरू ठेवता येणार, हा प्रश्न आहे. अनेक हॉटेलचालक व्यवसाय बंद करणे लांबणीवर टाकत आहेत. मात्र, फार काळ त्यांना हे शक्य होणार नाही. डोसा आणि उत्तपासारख्या पदार्थांना गॅस अधिक लागतो. त्यामुळे हे पदार्थ प्रामुख्याने बंद होतील,’ अशी माहिती पुणे रेस्टॉरन्ट अँड हॉटेलिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.
सध्या व्यावसायिक वापराचा गॅस सिलिंडर कुठेच मिळत नाही. यामुळे काही रेस्टॉरंटकडून इलेक्ट्रिक शेगड्या व इंडक्शनचा वापर केला जात आहे. परंतु इलेक्ट्रिक शेगड्यांच्या किमती २० हजार रुपयांच्या पुढे आहेत. शिवाय, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. या शेगड्या सध्या भाड्यानेही मिळत नाहीत. कोळशाच्या शेगड्या वापरण्यास सहा महिन्यापूर्वीच बंदी केली आहे. परंतु आता त्या मिळवून वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. – डॉ. किशोर सरपोतदार, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट अँड केटरिंग असोसिएशन
