पुणे : शहरातील हॉटेलांचा द्रवरूप पेट्रोलियम वायू (एलपीजी) सिलिंडर पुरवठा दोन आठवड्यांपासून बंद असून, त्याची झळ आता ग्राहकांच्या खिशाला बसू लागली आहे. हॉटेलचालकांकडून एलपीजी सिलिंडरला इतर इंधन पर्यायांचा वापर सुरू असून, त्याचा भार ग्राहकांवर टाकण्यात आला आहे. त्यातच खाद्यतेलासह इतर वस्तूंच्या किमती महागल्याचा परिणामही झाला आहे. यामुळे हॉटेलचालकांनी खाद्यपदार्थांच्या किमतीत सुमारे १० टक्के वाढ केली आहे.
पश्चिम आशियातील युद्ध सुरू झाल्यापासून व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद आहे. हॉटेलांना मिळणारा हा सिलिंडर ६ मार्चपासून बंद झाला. तेव्हापासून हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक हॉटेलचालकांनी कोळसा आणि विजेच्या शेगड्यांचा वापर सुरू केला आहे. मात्र, या शेगड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्या महागड्या किमतीत खरेदी कराव्या लागल्या आहेत. सध्या या शेगड्याही बाजारात उपलब्ध नाहीत. याचवेळी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार सुरू असून, तो अडीच ते तीनपट किमतीने उपलब्ध होत आहे. हा इंधनाचा खर्च वाढल्याने हॉटेलचालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
खाद्यतेलाच्या किमतीचाही भडका उडाला असून, किमतीत २० टक्के वाढ झाली आहे. याचबरोबर शेंगदाणा आणि डाळींच्या किमतीतही वाढ झाली आहे. यामुळे हॉटेलचालकांच्या खर्चात वाढ झाली आहे. आधीच इंधनाच्या वाढलेल्या खर्चात या वस्तूंच्या महागाईची भर पडली आहे. यामुळे शहरातील हॉटेलचालकांनी खाद्यपदार्थांच्या किमतीत सुमारे १० टक्के वाढ केली आहे. काही ठिकाणी ही वाढ ३० टक्क्यांपर्यंत आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता याची झळ बसू लागली आहे. सध्या पुण्यातील १० टक्के हॉटेल बंद झाली आहे. अनेक हॉटेल इंधनाच्या उपलब्धतेनुसार व्यवसाय सुरू ठेवत आहेत. इंधन मिळाल्यास हॉटेलांकडून व्यवसाय सुरू ठेवण्यात येत असून, ते संपल्यानंतर व्यवसाय बंद करण्यात येत आहे. यामुळे आगामी काळात खाद्यपदार्थांच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता हॉटेलचालक व्यक्त करीत आहेत.
कामगार निघून जाण्याचा धोका
शहरातील हॉटेल व्यवसायात सुमारे दीड लाख कामगार आहेत. यातील ७० टक्के कामगार हे परप्रांतीय आहेत. व्यवसाय बंद झाल्यास या कामगारांची उपासमार होणार आहे. त्यामुळे उपासमार टाळण्यासाठी हे कामगार त्यांच्या मूळ राज्यात परत जातील. पुढील महिन्यात काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. यामुळे एकदा गेलेला कामगार लवकर परतणार नाही. यातून आगामी काळात कामगार टंचाईची भीषण समस्या हॉटेल क्षेत्रासमोर उभी राहील, अशी माहिती पुणे रेस्टॉरन्ट अँड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी दिली.
कोळसा, लाकडासाठी प्रतीक्षा
एलपीजी सिलिंडर नसल्याने हॉटेलचालक कोळसा आणि लाकडाचा वापर करीत आहेत. मात्र, मागणी वाढल्याने कोळसा आणि लाकूड उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यासाठीही प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील मॉलमधील हॉटेल आणि मोठ्या रेस्टॉरंटमध्ये पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) जोडणी असून, उरलेली ९० टक्क्यांहून अधिक हॉटेल एलपीजी सिलिंडरवर अवलंबून आहेत. जिल्हा प्रशासनाकडे एलपीजी पुरवठा करण्याची विनंती करीत आहोत, असे नॅशनल रेस्टॉरन्ट असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा सायली जहागीरदार यांनी सांगितले.
शहरातील हॉटेल व्यवसाय
एकूण हॉटेल – १२ ते १५ हजार
एकूण कामगार – १ लाख ५० हजार
इंधननिहाय संख्या
एलपीजी सिलिंडरवर चालणारी हॉटेल – ९० टक्के
पीएनजी जोडणी असलेली हॉटेल – १० टक्के
जिल्हा प्रशासनाकडून एलपीजी सिलिंडर वितरणावर देखरेख ठेवण्यात येत आहे. सिलिंडरचा काळाबाजार आढळल्यास कारवाई करण्यात येत आहे. जिह्यातील सिलिंडरचा साठा आणि वितरण यांची आकडेवारी गॅस कंपन्यांकडून दररोज घेण्यात येत आहे. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरचा पुरवठा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. – महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी
