पुणे : पुणे शहरात यंदा पहिल्या सहामाहीत ४४ हजार २६५ घरांची विक्री झाली आहे. या कालावधीत घरांचे एकूण व्यवहार ३७ हजार ४८ कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. पुण्यात घरांची सरासरी किंमत ८४ लाख रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या चार वर्षांत घरांच्या सरासरी किमतीत ३८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

क्रेडाई पुणे आणि सीआरई मॅट्रिक्स यांनी पुणे महानगरातील गृहनिर्माण क्षेत्राचा या वर्षातील पहिला सहामाहीचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, पुण्यात पहिल्या सहामाहीत एकूण ४४ हजार २६५ घरांची विक्री झाली. त्यातील ७४ टक्के घरे ही १ कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीची आहेत. याच वेळी १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांचे प्रमाण २६ टक्के आहे. घरांच्या विक्रीत ५० लाख ते १ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण सर्वाधिक आहे. आता घरांची सरासरी किंमत ८४ लाख रुपयांवर पोहोचली आहे. त्यात २०२२ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत ३८ टक्के वाढ झाली आहे. ईशान्य पुण्यात घरांच्या सरासरी किमतीत २०२२ पासून ५४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

गेल्या पाच वर्षांत पुण्यात ४ लाख २८ हजार घरांची विक्री झाली आहे. या कालावधीत पुण्यात हैदराबादपेक्षा ३७ टक्के अधिक घरे विकली गेली आहेत. तसेच, याच कालावधीतील मुंबई आणि चेन्नई या शहरांतील एकत्रित घरांच्या विक्रीलाही पुण्याने मागे टाकले आहे. पुण्यात माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्र, जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी) आणि वाहननिर्मिती उद्योगाचा विस्तार होत असल्याने रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे. त्यामुळे देशभरातील कुशल मनुष्यबळ पुण्याकडे आकर्षित होत आहे. त्यातून घरांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

उद्योगांचा विस्ताराचा फायदा

पुण्यात मोठ्या घरांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. घरांच्या सरासरी किमती आता ८४ लाख रुपयांवर पोहोचल्या आहेत. घरांच्या विक्रीत ५० लाख ते १ कोटी रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण अधिक आहे. आयटी क्षेत्र, जागतिक क्षमता केंद्रे आणि वाहन उद्योगाच्या विस्तारामुळे पुण्यातील गृहनिर्माण बाजारपेठेला गती मिळत आहे, असे क्रेडाई पुणेचे अध्यक्ष मनीष जैन म्हणाले.

आलिशान घरांना प्राधान्य

गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत पुण्यात घरांच्या विक्रीत काही प्रमाणात स्थिरता आलेली आहे. त्याचा परिणाम प्रामुख्याने अल्प व मध्यम उत्पन्न गटापुरता मर्यादित राहिला आहे. याच वेळी आलिशान घरांना ग्राहकांकडून मागणी कायम असल्याने गृहनिर्माण क्षेत्राकडून अशा प्रकल्पांना प्राधान्य मिळत आहे, असे सीआरई मॅट्रिक्सचे मुख्याधिकारी अभिषेक किरण गुप्ता यांनी सांगितले.