पुणे : शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून १९ लाखांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी विश्रामबाग, बंडगार्डन आणि सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आहेत.
नवी पेठेतील लोकमान्यनगर परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा लाख ९८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. याबाबत नेहा श्रीराम वाघ (रा. बिबवेवाडी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, वाघ यांची आई चारधाम यात्रेला गेल्या आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातून १० लाख ९८ हजारांचे दागिने चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक खाडे तपास करत आहेत.
पुणे स्टेशन भागातील आगरकरनगर परिसरात एका सदनिकेत राकेशकुमार भगवती प्रसाद (वय ३७) हे खासगी रेल्वे आरक्षण केंद्र चालवितात. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ६८ हजार रुपयांचा लॅपटाॅप आणि रोकड चोरुन नेली. याबाबत प्रसाद यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.
सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख ३९ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. याबाबत बिपीन अजयराव घाडगे (वय ४५, रा. आशिष अपार्टमेंट, आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर तपास करत आहेत. चोरटे सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करतात. ज्या सोसायटीत रखवालदार नाहीत, अशा सोसायटीतील सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरुन नेतात.