पुणे : पुण्यात गेल्या वर्षी घरांच्या खरेदी-विक्री व्यवहारात घट नोंदविण्यात आली आहे. मात्र, त्यातून मिळणाऱ्या मुद्रांक शुल्क महसुलात वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांतील उच्चांकी मुद्रांक शुल्क सरकारला २०२५ मध्ये मिळाले आहे. एकूण व्यवहार कमी झाले असले, तरी घरांच्या किमती वाढल्याने मुद्रांक शुल्क महसुलात वाढ झाली आहे.
‘नाइट फ्रँक इंडिया’ने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील मालमत्ता क्षेत्राचा २०२५ चा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, पुण्यात गेल्या वर्षी १ लाख ८५ हजार ६५७ घरांचे खरेदी-विक्री व्यवहार झाले. त्याआधीच्या वर्षाच्या (२०२४) तुलनेत हे व्यवहार २.३ टक्क्यांनी घटले आहेत. गेल्या वर्षी घरांच्या व्यवहारातून ७ हजार ११९ कोटी रुपयांचा महसूल सरकारला मिळाला. गेल्या चार वर्षांतील हा उच्चांकी मुद्रांक शुल्क महसूल आहे. त्याआधी २०२४ मध्ये हा महसूल ७ हजार ९८ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी त्यात ०.३ टक्के वाढ नोंदविण्यात आली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पुण्यात घरांचे एकूण १२ हजार ७९ व्यवहार झाले. त्याआधीच्या वर्षातील याच महिन्यात १७ हजार ३४८ व्यवहार झाले होते. त्या तुलनेत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये व्यवहारात ३० टक्के तर मुद्रांक शुल्कात २८ टक्के घट झाली. गेल्या वर्षी सहा महिन्यांतील सरासरी मासिक व्यवहार १२ हजार ४०६ होते. त्या तुलनेत डिसेंबरमध्ये १० टक्के कमी व्यवहार झाले.
गेल्या वर्षी घरांच्या एकूण व्यवहारात २५ लाख रुपयांपर्यंत किमतीच्या घरांचे प्रमाण २७ टक्के, ५० लाख रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण २९ टक्के, ५० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण २९ टक्के, १ ते २.५ कोटी रुपयांच्या घरांचे प्रमाण १३ टक्के, २.५ ते ५ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचे प्रमाण २ टक्के आणि ५ कोटी रुपयांवरील घरांचे प्रमाण १ टक्क्याहून कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मध्यम आकाराच्या घरांना पसंती
पुण्यात गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या घरांच्या व्यवहारात ५०० ते ८०० चौरस फूट आकाराच्या घरांचा वाटा सर्वाधिक ४६ टक्के आहे. त्याखालोखाल ५०० चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या घरांचा वाटा २४ टक्के, ८०० ते १ हजार चौरस फुटांच्या घरांचा वाटा १५ टक्के, १ ते २ हजार चौरस फुटांच्या घरांचा वाटा १२ टक्के आणि २ हजार चौरस फुटांपेक्षा मोठ्या आकाराच्या घरांचा वाटा ३ टक्के असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
पुण्यातील घरांचे खरेदी-विक्री व्यवहार
| वर्ष | व्यवहारांची संख्या | मुद्रांक शुल्क (कोटी रुपयांत) |
| २०२२ | १,३९,३२ | ४,८४३ |
| २०२३ | १,५२,३२३ | ५,३५२ |
| २०२४ | १,९०,०२५ | ७,०९८ |
| २०२५ | १,८५,६५७ | ७,११९ |
