पुणे : प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक चणचणीला तोंड देत शहरातील कचरावेचकांची मुले, रात्र शाळेतील विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी कामगिरी केली. आव्हानांना संधी मानून कष्टांची देत विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेचा खडतर यशस्वीरित्या टप्पा गाठत स्वप्नपूर्वीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

कचरावेचकांच्या मुलांची प्रेरणादायी कामगिरी

कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत संघटनेच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल ८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेतून सर्वाधिक ७१, कला शाखेतून २९ आणि विज्ञान शाखेतून १३ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. स्वच्छ संस्था आणि कष्टकरी पंचायतीने विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके, विशेष शिकवणी वर्ग सुविधा उपलब्ध करून दिली होती.

कळस वस्तीत राहणाऱ्या मंगल गोविंद सकट घरच्या परिस्थितीमुळे १५ वर्षांपूर्वी शिक्षण सुटले होते. सध्या त्या पतीसोबत फिरून कचरा वेचतात, दुपारी धुणी-भांडी करतात. मात्र, त्यांना शिक्षणाची ओढ कायम असल्याने त्यांनी १७ नंबरचा फॉर्म भरला. त्यांनी रात्री अभ्यास करून परीक्षेत ६९ टक्के गुण मिळवले. हडपसर भागात कचरा संकलनाचे काम करणाऱ्या अर्चना आणि शंकर कांबळे यांची मुलगी संध्या हिने कॉमर्स शाखेतून ८२.१७ टक्क्के गुण मिळवले. संध्याला आता पोलिस भरतीची तयारी करायची आहे.

वडिलांच्या निधनानंतर श्रुती लोंढे हिने बहिणीच्या मदतीने घरीच अभ्यास करून ७५ टक्के गुण प्राप्त केले. तिला आता आर्किटेक्ट व्हायचे आहे. वारजे येथील संगीता निर्मल हिने ७४.८३ टक्के गुण मिळवले आहेत. तिला वडिलांच्या मृत्यूनंतर आईने घेतलेल्या कष्टाची परतफेड करण्यासाठी एमबीए करायचे आहे. ७२.८३ मिळवलेल्या पूजा रावत या कोथरूड येथील विद्यार्थिनीला पोलिसात भरती होण्याची इच्छा आहे.

दिव्यांग असलेल्या कृष्णा लांडगे याने ५५ टक्के गुण मिळवले असून, शासकीय नोकरी मिळवण्याचे त्याचे स्वप्न आहे. पिंपरी चिंचवड येथे घंटागाडीवर काम करणाऱ्या विजय माने यांची मुलगी दीपाली हिने अभ्यासात सातत्य ठेवत वाणिज्य शाखेतून ८५.६७ गुण मिळवले. बारावी उत्तीर्ण होणारी ती कुटुंबातील पहिली आहे.

रात्रशाळेतील विद्यार्थ्यांचे यश

कुटुंबाची बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने दिवसा काम करून रात्री शिक्षण घेत पूना नाईट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. रात्रशाळेचा निकाल ९२.५९ टक्के लागला. सोलापूरचा मूळ रहिवासी असलेला प्रीतम देशपांडे याने ७३.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. घरच्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी दिवसा काम करून प्रीतमने रात्री शिक्षण सुरू ठेवले. दिवसा हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत यश कुळे या विद्यार्थ्याने ६३.८३ टक्के, दिवसा मेडिकल दुकानात काम करून ओमकार कदमने ६२.८३ टक्के गुण मिळवले.

चिन्मयी धोंडे हिने ५५ टक्के गुण मिळवून मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवला. पुणे महापालिकेत कार्यरत असलेल्या ४७ वर्षीय मनीषा गोविंद झुजम यांनी २२ वर्षानंतर पुन्हा शिक्षणाचा प्रवास सुरू केला. दिवसा नोकरी आणि रात्री अभ्यास अशी दुहेरी कसरत करून त्यांनी बारावीच्या परीक्षेत ५३ टक्के गुण प्राप्त केले. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे रात्र प्रशालेचे प्राचार्य सतीश वाघमारे, शाला समितीचे अध्यक्ष अविनाश नाईक, प्रा. नीलेश साबणे, प्रा. नीता गायकवाड यांनी कौतुक केले.

दिव्यांग विद्यार्थ्यांची शारीरिक आव्हानांवर मात

दिव्यांग विद्यार्थ्यांनीही परीक्षेत उत्तम यश संपादन केले. फर्ग्युसन महाविद्यालयातील अंजनेय गाडगीळ या अंध विद्यार्थ्याने विज्ञान शाखेतून ८०.५ टक्के गुण मिळवले. तसेच कला शाखेतील चिन्मय परे या विद्यार्थ्याने ८५.१७ टक्के, आर्या दंताळेने ८५.१७ टक्के, आदित्य भांडारकरने ७४.६७ टक्के गुण मिळवले. निवांत अंध विकासालयातील कला आणि वाणिज्य शाखेच्या ३६ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. त्यातील रिद्धी पाटील या विद्यार्थिनीने लेखनिक न घेता संगणकावर स्वत: टायपिंग करत बारावीची परीक्षा दिली होती. रिद्धीने परीक्षेत ८६.८३ टक्के गुण मिळवले. कला शाखेतून आदित्य मंगल या विद्यार्थ्याने ८४.८३ टक्के गुण प्राप्त केले. निवांत संस्थेर्फे विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात, अशी माहिती संस्थेच्या उमा बडवे यांनी दिली.