पुण्यातील कोथरूड भागात राहणार्‍या एका पतीने पत्नीच्या मोबाईलमध्ये स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर नावाचे अ‍ॅप डाऊनलोड केल होतं. या अ‍ॅपच्या माध्यमातून ८ वर्षांपासून पत्नीची गोपनीय माहिती मिळविल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नीच्या चारित्र्याच्या संशयातून पतीने केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे दोघे पती पत्नी आहेत. फिर्यादी यांच्याकडे पती वारंवार पैशांची मागणी करीत होता. त्यावरुन दोघांमध्ये सतत वाद होत होते. तसेच आरोपी पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यावरुन त्याने शिवीगाळ करत अनेक वेळा मारहाण देखील अकेली आहे. फिर्यादी यांना त्यांच्या पतीने २०१३ मध्ये एक मोबाईल भेट दिला. त्या मोबाईलमध्ये स्पाय अ‍ॅप अँड रेकॉर्डर नावाचे अ‍ॅप अगोदर डाऊनलोड करुन ठेवण्यात आले होते. या अ‍ॅपद्वारे पत्नीची सर्व माहिती परस्पर आरोपी पती त्याच्या स्वत:च्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये घेतल्याचे फिर्यादी पत्नीच्या लक्षात आलं. त्यानंतर पत्नीने पती विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयामधून केल्याचे पोलिसानी सांगितले.