पुणे : ‘मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वेमुळे दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर अवघ्या ४८ मिनिटांमध्ये पार करता येणार असताना पुणे ते हैदराबाद ही दोन शहरेदेखील जवळ येणार आहेत. पुणे ते हैदराबाद प्रवास एक तास ५५ मिनिटांमध्ये साध्य होणार आहे,’ अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

‘पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्राबरोबर माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी चालना मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याला याचा सर्वाधिक फायदा होईल,’ असे मत वाहतूक तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

वैष्णव म्हणाले, ‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मुंबई-पुणे-हैदराबाद स्वतंत्र ‘हायस्पीड रेल्वे काॅरिडाॅर’ साकारण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हे महत्त्वाचे मार्ग महाराष्ट्राला मोठा फायदा देणारे ठरणार आहे. हे कॉरिडॉर ३५० किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या ‘बुलेट ट्रेन’साठी तयार केले जाणार आहेत. पूर्णपणे उन्नत मार्ग असून पुणे ते हैदराबाद, सुमारे ६०० किलोमीटर अंतर अवघ्या एक तास ५५ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. रस्ते मार्गाने हे अंतर पार करण्यासाठी ८ ते १० तासांचा कालावधी लागतो. तसेच, लोहमार्गावर धावणाऱ्या सिकंदराबाद, हैदराबाद डेक्कन, कोणार्क आणि हुसेननगर एक्सप्रेसने सरासरी ९ तास प्रवासात खर्च करावे लागत आहे.’

‘सध्या मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरू या शहरांमधील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रांचा विकास होत असताना या हायस्पीड प्रकल्पामुळे झपाट्याने बदल होतील. प्रवासाचे अंतर कमी झाल्याने महामार्गांवरील कोंडी आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचा चालना मिळेल,’ असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.

‘कॉरिडॉर सोलापूरसाठी महत्त्वाचा’

‘पुणे ते हैदराबाद हायस्पीड रेल्वे काॅरिडाॅर सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे. नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमित्त पुणे जिल्ह्यात स्थलांतरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. वस्त्रोद्योग, वैद्यकीय क्षेत्रांबरोबर कृषिमालाच्या वाहतुकीला मोठा फायदा होईल. शैक्षणिक संस्था, उद्योगधंदे आणि रोजगार निर्माण होतील,’ असे सोलापूर-पुणे दररोज प्रवास करणारे रेल्वे प्रवासी शैलेश गडक यांनी सांगितले.

मुंबई-पुणे-सोलापूर या लोहमार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत असल्याने सोलापूर, पंढरपूरमधील प्रवास सुलभ आणि वेगवान झाला आहे. हायस्पीड रेल्वे काॅरिडाॅरमुळे प्रवासाला गती मिळाल्याने स्थलांतरांचे प्रमाण कमी होऊन दैनंदिन दळणवळण सुविधा सुलभ होतील. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. इंदापूर, दौंड, उरुळी या ठिकाणांवरून शिक्षण, व्यवसाय, कार्यालय आणि इतर कामानिमित्त दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांना फायदेशीर ठरेल. याची अंमलबजावणी वेगाने होणे गरजेचे आहे. – हर्षा शहा, रेल्वे वाहतूक अभ्यासक आणि रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्ष

पुणे ते हैदराबाद विमानसेवा सुरू असली, तरी आर्थिकदृष्ट्या हायस्पीड रेल्वे काॅरिडाॅर फायद्याचा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे दळणवळण सुविधांना चालना मिळेल. त्याबरोबर पुणे, सोलापूर जिल्ह्यातील शहरांची अर्थव्यवस्थाही वाढेल. व्यापार, रोजगारनिर्मिती होईल. प्रामुख्याने वाहतूककोंडी, प्रदूषण यापासून सुटका होईल. – अमित परांजपे, सदस्य, विमानतळ सल्लागार समिती