खासगी कारवर लाल-निळा दिवा लावून अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरवर कब्जा करणाऱ्या प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांची बदली वाशिमला करण्यात आली आहे. खासगी ऑडी कारवर अंबर दिवा लावणं, महाराष्ट्र शासनाचा बोर्ड लावणं, वरिष्ठ अधिकारी मुंबईला गेले असताना त्यांचं अँटी चेंबर बळकावणं असे पूजा खेडकरांचे अनेक कारनामे समोर आले आहेत. पुणे जिल्ह्यात प्रोबेशन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्या रुजू झाल्या होत्या. आता या आरोपानंतर त्यांची वाशिमला बदली करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांनी मसुरीतून केलं प्रशिक्षण पूर्ण

पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांनी मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी या पदाचं प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे जिल्ह्यात त्यांना पाठवलं जावं असा निर्णय प्रशासकीय पातळीवर झाला. हा निर्णय राजकीय प्रभावातून घेतला गेला अशी चर्चाही सुरु झाली. तसंच पुणे जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वीच पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना व्हॉट्स अॅप मेसेज केला. त्यात त्यांनी स्वतंत्र केबीन, स्वतंत्र कार, दिमतीला एक शिपा आणि निवासस्थान यासंदर्भातली मागणी केली. मात्र प्रोबेशन कालावधीत असलेल्या सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याला या सुविधा देणं नियमांत बसत नाही हे सांगण्यात आलं. तर निवासस्थान उपलब्ध करुन दिलं जाईल असं जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आलं.

पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी ३ ते १४ जून

३ जून ते १४ जून २०२४ या कालावधीत पूजा खेडकर या पुणे कार्यालयात रुजू झाल्या. या कालावधीत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांस बसून, चर्चा करुन कामकाज कसं चालतं याची माहिती आणि अनुभव घेणं अपेक्षित होतं. त्यानंतर त्यांची रवानगी इतर प्रशासकीय कार्यालयांमध्ये होणार होती.

हे पण वाचा- ‘चमकोगिरी’मुळे पुण्याहून वाशिमला बदली झालेल्या पूजा खेडकर कोण आहेत? नेमकं त्यांनी काय केलं?

स्वतंत्र केबीनसाठी वडिलांसह शोधाशोध

पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम या महिला असल्याने ४ जूनला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कदम यांच्या केबीनमध्ये बसून खेडकर यांनी अनुभव घ्यावा असं त्यांना सांगण्यात आलं. मात्र ही सूचनाही त्यांनी नाकारली आणि रुजू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्वतंत्र कक्ष मागितली. पूजा खेडकर यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील चौथ्या मजल्यावरच्या कुळकायदा शाखेत बैठक व्यवस्था करुन देण्यात आली. मात्र त्यांनी बैठक व्यवस्था नाकारली. यानंतर पूजा खेडकर यांनी त्यांचे वडील दिलीप खेडकर यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत हव्या असलेल्या केबीनचा शोध सुरु केला.

पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या केबीनवर दावा सांगितला. अजय मोरेंनी अँटी चेंबरमध्ये बसण्यासाठी पूजा यांना संमती दिली होती. तरीही माझ्या मुलीला बसण्यासाठी स्वतंत्र जागा का नाही? ही इमारत कुणी बांधली आहे? प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था का करण्यात आली नाही असे प्रश्न उपस्थित केले.

अजय मोरेंच्या अँटी चेंबरवर केला दावा

पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे हे १८ ते २० जूनच्या दरम्यान शासकीय कामासाठी मुंबईत गेले होते. त्यावेळी पूजा खेडकर यांनी अजय मोरेंच्या अँटी चेंबरमधले टेबल, खुर्च्या, सोफा बाहेर काढायला लावला आणि त्या चेंबरचा ताबा घेत तिथे स्वतःसाठी टेबल, खुर्च्या आणि फर्निचर यांची व्यवस्था करायला लावली.

अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरेंनी याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी सुहास दिवसेंकडे केली. त्यानंतर त्यांनी पूजा खेडकर यांनी ठेवलेलं फर्निचर आणि इतर सामान बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. मात्र तुम्ही असे केल्यास माझा अपमान होईल असा मेसेज पूजा यांनी दिवसे यांना पाठवला. या कालावधीत पूजा खेडकर स्वतःच्या ऑडी या कारवर शासकीय वाहनांवर असतो तसा अंबर दिवा लावून त्यातून ये-जा करत होत्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune ias officer pooja khedkar in controversy due to her tantrums audi car new interior for office scj
Show comments