पुणे : एम.फिल आणि पीएच.डी. अशा पदव्युत्तर पदव्या मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी समाज आणि देशाच्या विकासात हातभार लावला पाहिजे, असे मत भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयसर पुणे) संचालक डॉ. जयंत उदगावकर यांनी मांडले.

डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या बाराव्या पदवीदान समारंभात डॉ. उदगावकर बोलत होते. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. बिबेक देब्रॉय, कुलगुरू डॉ. प्रमोद पांडेय, प्र कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी आदी या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात एकूण २४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. तसेच गुणवत्तेसाठीची विविध वैयक्तिक पारितोषिकेही प्रदान करण्यात आली.

भारताला शास्त्रशुद्ध शिक्षण पद्धतीची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. तैत्तरीय उपनिषदात स्पष्टपणे दीक्षान्त समारंभाचे भाषण आणि विद्यार्थ्यांनी घ्यायच्या शपथेचा उल्लेख आहे. पदवीधारकांना आयुष्यात हवे ते मिळो किंवा न मिळो, पण आयुष्यात जे मिळते ते त्यांनी प्रेमाने केले पाहिजे. कोणतेही चांगले-वाईट काम करताना विद्यार्थ्यांनी संस्थेचा गौरव लक्षात ठेवावा, असे डॉ. देब्रॉय यांनी सांगितले.