पुणे : शहरात बेकायदा जाहिरात फलक, तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत. आठवडभरात शहरातील सर्व बेकायदा फलक काढण्यात येणा असून, बेकायदा फलक लावणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे करण्यात येणार आहे, असा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
शहरात बेकायदा फलक (होर्डिंग्ज) लावण्याचे प्रकार वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत बुधवारी पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा या वेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक पार पाडली. बेकायदा फलकांमुळे शहर विद्रुप दिसते. अशा प्रकाराच्या फलकांमुळे शहराच्या प्रतिमेवर परिणाम होताे. बेकायदा फलक लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार महापालिका आणि पोलिसांकडे आहेत. शहरात बेकायदा फलक लावण्याचे फलक वाढले आहेत. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि काही व्यावसायिक बेकायदा फलक लावतात. अशा प्रकारचे फलक काढण्यासाठी धोरण ठरविण्याची गरज आहे. बेकायदा फलक काढणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आठवडाभरात शहरातील सर्व बेकायदा फलक काढण्यासाठी संयुक्त मोहिम राबविण्यात येणार आहे. फलक तयार करून देणाऱ्या व्यावसायिकांची यादी तयार करण्यात आली आहे. बेकायदा फलक लावणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.’
‘पावसाळ्याआधी करण्यात येणाऱ्या कामांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरात पाणी साचणारी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पाणी साचणाऱ्या ४०० ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. ज्या भागात पाणी साचते. अशा ठिकाणी पावसाळ्याआधी कामे करण्यात यावीत, याबाबत चर्चा करण्यात आली. पाणी साचणाऱ्या ४०० ठिकाणांची यादी महापालिका प्रशासनाला देण्यात आली आहे’, असे त्यांनी नमूद केले.
बेवारस धूळखात पडलेल्या वाहनांवर कारवाई
‘शहरात रस्त्याच्या कडेला वाहने लावण्यात येतात. ही वाहने जागेवरुन काढली जात नाही. धूळखात पडलेल्या वाहनांच्या मालकांना वाहने काढण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतुकीस अडथळा करणारी बेवारस वाहने काढण्याबाबत महापाालिका अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. महापालिकेची वाहने बेवारस वाहने उचलतील. वाहने उचलण्याचा खर्च संबंधित वाहन मालकाकडून वसूल केला जाणार आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.
शहराला शिस्त लावण्याचा प्रयत्न
‘शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढील काळात कडक कारवाई करण्यात येणार आहे. गुटखा बंदीवर पोलीस ठाम आहेत. शहर विद्रुप करणे, बेवारस वाहनांवर कारवाई करुन शहराला शिस्त लावण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे’, असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी नमूद केले.
अतिक्रमणांवर कडक कारवाई
‘शहरात विकासकामे सुरू आहेत. विकासकामे सुरू असताना त्याला शिस्त असणे आवश्यक आहे. अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवून वाहतुकीचा वेग वाढण्यासाठी पोलस आणि महापालिका प्रसासनाकडून प्रयत्न करण्यात आले आहे. प्रमुख रस्त्यांवर वाहतूक विषयक सुधारणा करण्यात आल्या आहेत. शहराचा नावलौकिक वाढविणे, तसेच वाहतूक विषयक सुधारणांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्या आहेत.’, असे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले.
अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होत असेल, तर आता वेगळा विचार करावा लागेल. प्रत्येक प्रभागनिहाय महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. पुणे शहरात अधिकृत २२ हजार पथारी व्यावसायिक आहेत. प्रत्यक्षात मात्र शहरात पाच ते सहा लाख बेकायदा पथारी व्यावसायिक आहेत. त्यामुळे आता अतिक्रमणांवर कडक कारवाई करावी लागेल.
-नवलकिशोर राम, महापालिका आयुक्त
