पुणे : बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयातील अधीक्षकपुराण लांबत चालले आहे. गेल्या वर्षभरात पाच अधीक्षक नेमण्याचा विक्रम रुग्णालयाच्या नावावर नोंद आहे. सध्या रुग्णालयात अंतर्गत राजकारणाने जोर धरला आहे. याचवेळी रुग्णांचे हाल सुरू असून, रुग्णसेवा कोमात गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ससूनमध्ये रुग्णसेवा प्रथम असे मानून काम होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मागील काही काळापासून अंतर्गत राजकारणाने रुग्णालय पोखरले गेले आहे. एकमेकांवर उघडपणे कुरघोड्या करण्यात येत आहेत. रुग्णालयाच्या वरिष्ठ व्यवस्थापनात सध्या गटतट निर्माण झाले आहेत. आपल्या गटात कोण आणि दुसऱ्या गटात कोण याचीच चर्चा रुग्णालयाच्या आवारात करताना अधिकारी दिसून येतात. एकमेकांना शह आणि काटशह देण्याचे राजकारण सध्या सुरू आहे. या सर्व राजकारणाच्या गदारोळात रुग्णसेवेच्या मुख्य सेवेलाच हरताळ फासला जात आहे.

हेही वाचा – पुणे : कौटुंबिक वादातून वडिलांनीच दिली मुलाची सुपारी, जंगली महाराज रस्त्यावरील गोळीबाराचा उलगडा

रुग्णालयात बाह्यरुग्ण कक्षात रुग्णांच्या मोठ्या रांगा कायम दिसून येत आहेत. रुग्णांना बसण्यासाठी पुरेशी आसने नसल्याची परिस्थिती आहे. तपासणीसाठी रुग्णांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. ससूनमध्ये मागील काही दिवसांपासून औषधांची टंचाई आहे. यामुळे अनेक अत्यावश्यक औषधे रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांना मिळत नाहीत. रुग्णालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांना पुन्हा औषधासाठी रुग्णालयाबाहेरील औषध विक्री दुकानाची वाट धरावी लागत आहे. रुग्णालयात बुधवारी औषधांसाठी मोठी रांग दिसून आली. मात्र, औषधे उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना मोकळ्या हाती जावे लागले. यातच एक्स रे, सोनोग्राफी यासारखी तपासणी करण्यासाठी रांग दिसून आली. अनेक ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी नसल्याने रुग्णांचे नातेवाईक स्ट्रेचर घेऊन जात असल्याचे चित्र दिसून आले.

हेही वाचा – पुणे ठरले उणे! आंतरराष्ट्रीय उड्डाणात छोट्या शहरांनीही टाकले मागे; जाणून घ्या स्थान…

अंतर्गत राजकारण संपेना

आता नवीन अधीक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव यांच्या नियुक्तीला आक्षेप घेण्यात आला आहे. डॉ. जाधव हे पदासाठी पात्र नाहीत, असे गोपनीय पत्र अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना पाठविले आहे. यामुळे अधीक्षकपदाचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. या पत्रात डॉ. जाधव हे वैद्यकीय अधीक्षकपदाचे निकष पूर्ण करीत नाहीत, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

ससूनमधील रुग्ण वाऱ्यावर…

  • बाह्यरुग्ण विभागात रुग्णांच्या मोठ्या रांगा
  • उपचारासाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ
  • मागील काही काळापासून रुग्णालयात औषधांची टंचाई
  • खासगी औषध खरेदीचा रुग्णांना भुर्दंड
  • रुग्णांच्या नातेवाईकांवरच स्ट्रेचर ढकलण्याची वेळ