अत्याचाराला विरोध केला म्हणून आरोपीने महिलेचे डोळेच काढल्याची संतापजनक घटना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात घडली. या पीडित महिलेची आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भेट घेतली. या भेटीनंतर दरेकर यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. “पीडित महिलेची दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली आहे. ती पूर्वीसारखी येण्याच्या दृष्टीने डॉक्टरांना सूचना केल्या आहेत. आम्ही पीडित महिलेच्या पाठीशी आहोत. पण ज्यावेळी हाथरस येथील घटनेवरून राजकारण आणि मोठ मोठ्याने बोलणारे, आता या घटनेवर का बोलत नाही,” अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली.

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात दोन दिवसांपूर्वी एक महिला रात्रीच्या वेळी प्रातविधीसाठी गेली होती. त्याच दरम्यान एका तरूणाने महिलेची छेड काढली. त्यावर महिलेने प्रतिकार केला असता. त्या तरुणाने महिलेचा एक डोळा काढला. तर दुसरा डोळा निकामी केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर त्या पीडित महिलेला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ससून रूग्णालयात जाऊन पीडित महिलेची आणि कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधला.

प्रविण दरेकर म्हणाले, “पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांत महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व घटना निंदनीय असून, शिरुर येथील ज्या माऊलीचे दोन्ही डोळे गेले आहे, हे पाहून खूप दुःख झाले आहे. या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर पकडावे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे. तसेच या महिलेचे डोळे पुन्हा पूर्वीसारखे होतील, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्या महिलेच्या पाठीशी आम्ही सर्व जण असून, आमच्याकडून सर्वोतोपरी मदत केली जाणार आहे. त्याच बरोबर या घटनेकडे सरकारने गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. मात्र असे या सरकारकडून होताना दिसत नाही. आता पोलीस विभागाने अशा घटना होता कामा नये, याकडे लक्ष देण्याची गरज आहे,” असं दरेकर यांनी सांगितलं.