पुणे : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ पुण्यातील उद्योगांनाही बसणार आहे. पुण्यातील ४७ टक्के उद्योगांवर या युद्धाचा परिणाम होणार असून, त्यात २१.२ टक्के उद्योगांवर तीव्र आणि २५.८ टक्के उद्योगांवर सौम्य परिणाम होणार असल्याचे ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर’ने (एमसीसीआयए) केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

‘एमसीसीआयए’ने सध्या सुरू असलेल्या युद्धाचा व्यवसायावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी पुण्यातील ६८ कंपन्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात युद्धाचा तीव्र नकारात्मक परिणाम होणार असल्याचे मत २१.२ टक्के उद्योगांनी नोंदविले. याच वेळी युद्धाचा सौम्य नकारात्मक परिणाम जाणवणार असल्याचे २५.८ टक्के उद्योगांनी सांगितले. युद्धाचा कोणताही परिणाम होणार नाही, असे ४१ टक्के उद्योगांचे मत आहे. युद्धाचा सकारात्मक परिणाम होणार असल्याचे मत ६ टक्के उद्योगांनी नोंदविले आहे. त्यामध्ये ३ टक्के उद्योगांवर सौम्य सकारात्मक आणि ३ जास्त सकारात्मक परिणाम होईल, असे म्हटले आहे.

आखातातील जलवाहतूक ठप्प झाल्यास इंधन आणि इतर वस्तूंच्या आयात व निर्यातीवर परिणाम होणार आहे. याचबरोबर पॉलिमरसह इतर प्रकारच्या कच्च्या मालाच्या किमतीत पुढील २ ते ३ दिवसांत १० टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे जुन्या दराने आधीचे कार्यादेश पूर्ण करणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांचा उद्योगांवर तीव्र नकारात्मक परिणाम होईल.

‘युद्धाचा परिणाम काही काळानंतर जाणवेल. त्याचे मूल्यमापन आताच करणे शक्य होणार नाही. काही ठिकाणी जलवाहतुकीत अडथळा निर्माण झाला असल्याने मालवाहतुकीवर आगामी काळात परिणाम दिसून येईल. सध्या असलेला कच्चा माल कमी झाल्यानंतर उत्पादक कंपन्यांना आधी झालेल्या कार्यादेशांचे पालन करणे अवघड बनेल,’ असेही निरीक्षण उद्योगांनी या सर्वेक्षणात नोंदविले.

तात्पुरती अनिश्चितता ‘पुण्यातील काही उद्योजकांशी आमची चर्चा झाली. अगदी सर्वांनाच नव्हे. पण, काही उद्योगांना या उद्योगाचा नक्कीच फटका जाणवत आहे. सध्या ‪अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला धोका निर्माण झाला आहे. पेट्रोल-डिझेलसह पॉलिमर (प्लास्टिक) उत्पादनासाठी लागणारा पेट्रोकेमिकलचा कच्चा माल महाग होत आहे. आपल्या निर्यातीमध्ये मोठा भाग खाडी मार्गाने जात असल्याने आणि दुबईसारख्या बंदरावर अवलंबून असल्याने तात्पुरती अनिश्चितता जाणवणे स्वाभाविक आहे. हा संघर्ष निवळेल आणि परिस्थिती लवकर स्थिर होईल,’ अशी आशा ‘एमसीसीआयए’चे महासंचालक प्रशांत गिरबने यांनी सांगितले.