केंद्र सरकारच्या दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यातील कसबा पेठ येथे काँग्रेस पक्षाकडून महागाई जुमला आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे मुखवटे घालून महिला आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. स्मृती ताई आता तरी महागाईवर बोला, गॅस कुठ नेऊन ठेवला, ताई बोला अशी घोषणाबाजी आंदोलनकर्त्या महिलांनी केली. तसेच यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या माजी महापौर कमल व्यवहारे या देखील आंदोलनात सहभागी झाल्या होता. “२०१४ मध्ये ४०० रुपये गॅस आणि ६० रुपये पेट्रोल असताना भाजपाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या. अनेक ठिकाणी आंदोलने केली होती. आम्ही सत्तेत आल्यावर निम्म्या दारात गॅस,पेट्रोल देऊ असे आश्वासन देऊन हे सरकार आले. पण आता या सरकारला सर्व सामान्य नागरिकांचा विसर पडला असून आंदोलन करणार्‍या स्मृती इराणी कुठे गेल्या?”,  असा सवाल माजी महापौर व्यवहारे यांनी केला.