पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्कमधील ‘इन्फोसिस’मध्ये अभियंता तरुणी रसिला हिच्या हत्येनंतर नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पोलीस कोठडीत असलेला आरोपी भाबेन सैलिया याचे कुटुंब गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. त्यामुळे सुरक्षा एजन्सीने भाबेन याला नोकरीवर घेताना त्याच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली होती का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. त्याला नोकरीवर घेताना त्याची पार्श्वभूमी तपासली असती तर त्याला याठिकाणी नोकरीवर घेतले नसते आणि कदाचित रसिलाची हत्याही झाली नसती,असे बोलले जात आहे.

हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये इन्फोसिसमधील अभियंता तरुणी रसिला राजू हिची हत्या झाली होती. रसिलाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरक्षारक्षक भाबेन सैलिया याला अटक केली आहे. त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. आरोपी भाबेन सैलियाबाबत नवीन माहिती समोर आली आहे. त्याचे कुटुंब गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. भाबेनच्या वडिलाचे दोन लग्न झाले आहेत. त्यानेही संपत्तीच्या वादातून आपल्या पहिल्या पत्नीच्या मुलाची म्हणजेच भाबेनच्या सावत्र भावाची हत्या केली होती, असा आरोप झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तसेच भाबेनच्या वडिलाने तिसरे लग्नही केल्याची माहिती समजते.

या माहितीनंतर भाबेनच्या कुटुंबाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत चर्चा होऊ लागली आहे. भाबेनच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी संबंधित सुरक्षा एजन्सीने त्याला नोकरीवर घेताना विचारात घ्यायला हवी होती, असे बोलले जात आहे. संबंधित सुरक्षा एजन्सीने भाबेनला नोकरीवर घेताना त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली होती का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सुरक्षा एजन्सीने त्याची कौटुंबिक गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असती तर त्याची कदाचित निवड झाली नसती आणि रसिलाची हत्या झाली नसती, असेही बोलले जात आहे. संबंधित सुरक्षा एजन्सीवर इन्फोसिस कंपनीकडून कारवाई होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, रसिला राजू ओ. पी (वय २५) ही तरुणी इन्फोसिसमध्ये अभियंता म्हणून काम करत होती. रसिला ही मूळची केरळची होती. रसिलाची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी सुरक्षा रक्षक भाबेनला मुंबईतून अटक केली. रसिला चहा पिण्यासाठी बाहेर येत असताना भाबेन तिच्याकडे बघत असल्याचा संशय आला. याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करीन, असे तिने भाबेनला बजावले होते. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून भाबेनने रसिलाची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते.