औद्योगिक केंद्र असलेले पुणे आता आर्थिक केंद्र बनू लागले आहे. राज्यात बहुराष्ट्रीय कंपन्याची सर्वाधिक जागतिक क्षमता केंद्रे (जीसीसी) पुण्यात आहेत. या निमित्ताने पुण्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुंतवणूक येत आहे. पुण्यात रोजगाराच्या संधी वाढत असल्याने त्यानिमित्ताने स्थलांतरित येण्याचे प्रमाणही खूप मोठे आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत पुणे परिसराचा वेगाने विस्तार होत आहे. या विस्ताराचा वेग एवढा प्रचंड आहे, की पुण्याच्या सीमारेषा पुसट होऊ लागल्या. मात्र, विस्तार होत असताना पायाभूत सुविधांचा विकास तेवढ्या वेगाने न झाल्याने त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसू लागला. त्यातूनच अनियोजित विकास आणि वाहतूक कोंडी ही प्रमुख आव्हाने सध्या भेडसावत आहेत.

पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाची दरी भरून काढण्यासाठी मागील काही वर्षांत पावले पडली. मात्र, त्यांना विलंबाचे ग्रहण लागले आहेत. पुण्यातील अलीकडच्या काळातील सर्वांत मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणजे मेट्रो. पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाझ ते रामवाडी हे दोन मेट्रो मार्ग सुरू झाले. या मार्गांवरील सेवा नियोजित मुदतीत सुरू होऊ शकली नाही. आता या मार्गांचा विस्तार वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली असा होणार आहे. स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू असून, त्यामुळे सातारा रस्त्यावर वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात खराडी ते खडकवासला आणि नळ स्टॉप ते माणिकबाग अशा दोन मार्गिका उभारण्यात येणार आहेत. याचबरोबर हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे कामही सुरू असून, ही सेवा सुरू करण्याचा मुहूर्त सातत्याने लांबणीवर पडत आहे. कात्रज चौकातील उड्डाणपूलही अशाच पद्धतीने रखडला आहे. भूसंपादनाचा तिढा निर्माण झाल्याने हा प्रकल्प जैसे थे आहे.

मेट्रोच्या प्रकल्पांचे काम संथ गतीने सुरू असतानाच घोषणा झालेले इतर अनेक प्रकल्पही अपेक्षित गतीने पुढे सरकत नसल्याचे दिसते. पुणे ते शिरूर या उन्नत महामार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, हे काम पूर्ण होण्यासाठी चार वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे पुणे-नगर रस्त्यावरून जाणाऱ्यांची वाहतूक कोंडीतून आणखी काही वर्षे सुटका होण्याची चिन्हे नाहीत. वर्तुळाकार मार्गाच्या ( रिंग रोड) कामालाही अपेक्षित गती मिळालेली नाही. वर्तुळाकार मार्गाच्या पश्चिम टप्प्यातील काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. याचवेळी पूर्व टप्प्यातील काम सुरू होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पुरंदर विमानतळ जागेवरच

पुण्यातील लोहगाव येथील विमानतळ हवाई दलाचे आहे. त्यामुळे पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी समोर आला. या विमानतळाच्या जागेवरून वाद झाल्याने ती बदलण्यात आली. अखेर पुरंदर विमानतळावर शिक्कामोर्तब होऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. ही भूसंपादनाची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. या प्रक्रियेतही अडथळे येत असल्याने त्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. यामुळे पुरंदर विमानतळाचे उड्डाणही उशिराच होईल, अशी परिस्थिती आहे.

sanjay.jadhav@expressindia.com