पुणे महानगरातील एकही रस्ता अथवा भाग असा नसेल, तिथे एखाद्या प्रकल्पाचे काम सुरू नसेल. सध्या सुरू असलेले, लवकरच सुरू होणारे आणि प्रस्तावित अशा प्रकल्पांची लांबलचक यादी पाहता पुणेच ‘प्रकल्पबंबाळ’ झाले आहे.

पुण्याच्या लोकसंख्येत सातत्याने भर पडत असून, या महानगराचा विस्तारही वेगाने सुरू आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकार तसेच, स्थानिक शासकीय यंत्रणांवर येते. गेल्या काही वर्षांचा विचार करता त्या दृष्टीने योग्य नियोजन न केल्याने पायाभूत सुविधांच्या पातळ्यांवर सगळीकडे बोंब दिसते. पुण्यासह परिसरात कायम होणारी वाहतूक कोंडी हे त्याचे सर्वांत ज्वलंत उदाहरण. लोकसंख्या वाढत असताना वाहनांची संख्या वाढत जाणार, हे गृहित धरून नियोजन करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात सध्याची रस्त्यांची अवस्था ही ‘जड झाले ओझे’ अशी दिसते.

पुण्याची वाहतूक कोंडी ही सातत्याने चर्चेचा मुद्दा बनला आहे. त्यातून सरकारवर टीकेची झोड उठू लागल्यानंतर ती सोडविण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करण्याची स्पर्धा सुरू होते. यातूनच हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची स्वप्ने पुणेकरांना दाखविण्यात आली. या प्रकल्पात सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा ठरला तो पुणे मेट्रो प्रकल्प. सध्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गिकांवर मेट्रो धावते. या दोन्ही मार्गांची प्रकल्पीय दैनंदिन प्रवासी क्षमता सुमारे ६ लाख आहे. आजच्या घडीला विचार करता केवळ २.५ लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. परंतु, हेही नसे थोडके!

पुण्यातील मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गिकेवरील १२ स्थानकांदरम्यानच्या सेवेला मंजुरी मिळूनही त्याच्या उद्घाटनाला अजून मुहुर्ताची प्रतीक्षा आहे. याचबरोबर पिंपरी-चिंचवड ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे काम सुरू आहे. आगामी काळात मेट्रोचे रामवाडी ते वाघोली, खराडी ते खडकवासला, नळस्टॉप ते माणिकबाग हे मार्ग प्रस्तावित आहेत. मात्र, या प्रस्तावित मार्गांच्या कामाला अजून गती मिळालेली दिसत नाही.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सध्या बाह्य वर्तुळाकार मार्गाचे काम सुरू आहे. पुण्याच्या परिसराभोवती जलद वाहतूक यामुळे शक्य होणार आहे. या मार्गाचे काम सध्या सुरू असून, त्याला अपेक्षित गती नाही. त्यातच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अंतर्गत वर्तुळाकार मार्गासाठी भूसंपादनाचे पाऊल उचलले आहे. यात भर म्हणून पुणे महापालिकेने उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर) प्रकल्पाला गती देण्याचे पाऊल उचलले आहे. पुण्यातील रस्त्यांवर हा उन्नत मार्ग असणार आहे. यालाच भरीस भर म्हणून पाताळ लोक हा भुयारी मार्ग उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या प्रकल्पाचा आराखडा बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे एकाच वेळी चार-चार प्रकल्पांचे नियोजन असून, त्यातील एकही लवकरात लवकर तयार होऊन वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका करणारा नाही.

आणखी उन्नत मार्ग

पुण्याभोवतालच्या परिसरातील वाहतुकीला गती देण्यासाठी उन्नत मार्गांचे जाळे उभारण्यात येणार आहे. यात पुणे ते शिरूर, हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या द्रुतगती उन्नत मार्गांचा समावेश आहे. या सर्व उन्नत मार्गांवर पथकर आकारणी होणार आहे. या प्रकल्पांचे भूमिपूजन झाले असले तरी त्यांच्या कामाची सुरुवात होण्यास पुढील वर्ष उजाडणार आहे. त्यानंतर चार वर्षांत हे प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ठरलेल्या कालावधीत हे प्रकल्प पार पडले तरी पुढील चार वर्षे वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका नाही, हे निश्चित.

sanjay.jadhav@expressindia.com