पुणे : वैमनस्यातून सराइतांनी तरुणावर तलवारीने वार केल्याची घटना खडकी परिसरात घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.
लेस्ली अलेक्झांडर चार्ली (वय २०, रा. कसाई मोहल्ला, खडकी बाजार) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रतीक सपकाळ (वय २५), तरुण सुरेश पिल्ले (वय ३३, दोघे रा. खडकी बाजार) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. याबाबत चार्ली याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा…कौतुकास्पद : अर्ध्या तासात चार वर्षांच्या मुलीला शोधण्यात पोलिसांना यश
चार्ली सोमवारी दुपारी खडकी बाजार परिसरातील पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरून निघाला होता. त्याचा काही दिवसांपूर्वी आरोपींशी वाद झाला होता. दुचाकीस्वार चार्लीचा आरोपींनी पाठलाग केला. त्याला बोपोडीतील रेल्वे भुयारी मार्गाजवळ अडवले.
आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. पिल्ले याने त्याच्याकडील तलवारीने चार्लीवर वार केला. त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनाने चार्लीच्या डोक्यात दगड मारल्याने तो गंभीर जखमी झाला. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चोरमले तपास करत आहेत.