पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील जलकोंडीला या भागातील नैसर्गिक जलप्रवाहांवरील अतिक्रमण कारणीभूत असल्याची बाब सोमवारी प्रशासकीय यंत्रणांच्या पाहणीत स्पष्ट झाली. या पार्श्वभूमीवर हिंजवडीतील रहिवाशांनी ओढ्यांचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली आहे.‘हिंजवडी आयटी पार्कची उभारणी करताना या परिसरातील ओढ्यांना जाणीवपूर्वक नाल्यांचे रूप देण्यात आले. डोंगरावरून वाहत येणारे हे ओढे बारमाही वाहते नव्हते. त्यामुळे त्यांची पावसाळ्यातील वहनक्षमता लक्षात न घेता त्यांची खोली आणि रुंदी कागदोपत्री गृहीत धरण्यात आली.
या ओढ्यांची रुंदी ४ ते १० मीटर होती. सर्व्हे ऑफ इंडियाच्या २०११ च्या सर्वेक्षणात हिंजवडी परिसरात शंभराहून अधिक ओढे होते. नंतर विकासाच्या नावाखाली बांधकामे करताना गृहनिर्माण संस्था आणि कंपन्यांनी हे ओढे बुजविले,’ असा आरोप हिंजवडी आयटी पार्क रेसिडंट्स वेलफेअर असोसिएशनचे (हिरवा) रवींद्र सिन्हा यांनी केला.‘डोंगरउतारावरून वाहत येणाऱ्या ओढ्यांना नाल्याचे रूप सुरुवातीला देण्यात आले. नंतर त्यांचा वापर सांडपाणी वाहिन्या म्हणून करण्यात आला. त्यानंतर पावसाचे पाणी डोंगरावरून खाली आल्यानंतर ते वाहत जाऊन नदीला मिसळण्याचे नैसर्गिक प्रवाह बंद झाले. नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने पावसाच्या पाण्याचा प्रवाह दुसरीकडे वळण्यास सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांत कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याच्या घटना वाढत आहेत. ओढ्यांवर अतिक्रमण आणि अरुंद झालेले पात्र यामुळे आंबिल ओढा आणि भैरोबानाल्याला पूर आला होता.
हिंजवडीतही भविष्यात असा प्रकार घडू शकतो,’ असा दावा सिन्हा यांनी केला.हिंजवडी आयटी एम्प्लॉइज आणि रेसिंडट्स ट्रस्टचे (हार्ट) ज्ञानेंद्र हुलसुरे म्हणाले, ‘आयटी पार्कमध्ये बांधकाम परवानगी देताना शासकीय यंत्रणांनी कोणताही विचार केला नाही. पावसाचे पाणी वाहून जाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजविण्यात आल्याने ते पाणी रस्त्यावर येत आहे. रस्त्यावरील पाणी शेतीत जाऊन नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी सीमाभिंती बांधून हा प्रवाह पुढे रोखला आहे. कंपन्यांनी ओढ्यांवर केलेल्या अतिक्रमणामुळे सगळे पाणी आमच्या शेतात येत आहे, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. यावरून आधी अनेक वेळा वादही झाले आहेत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची आवश्यकता आहे.’