पुणे फिल्म फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा देशभरातल्या चित्रपटप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय असतो. दरवर्षी या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चित्रपटप्रेमींना आता आनंदाची बातमी मिळाली आहे. या वर्षीच्या PIFF च्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदाचं हे या महोत्सवाचं १९ वं वर्ष आहे.
यंदाचा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) येत्या २ ते ९ डिसेंबर दरम्यान भरवण्यात येणार आल्याची माहिती फाऊंडेशनचे अधक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकारपरिषदेत दिली. महोत्सवाचे हे १९ वे वर्ष आहे. सुमारे १५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स व लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय(NFAI) इथं यंदा महोत्सवातील चित्रपट दाखवले जाणार आहेत .




दरम्यान, या महोत्सवाची ऑनलाइन नोंदणी १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी चित्रपट समीक्षक समर नखाते, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे प्रमुख प्रकाश मगदूम हे उपस्थित होते.