प्रायव्हसी. प्रत्येकालाच ही स्पेस हवी असते. बंधने नकोत, म्हणून सीमा ठरवायच्या. संवादाची भाषा नेमकी. वागणे बोलणे पद्धतशीर. तरीही कुटुंबात प्रेम आहे, ते दिसण्यासाठी वर्षातून एकदा भेटू, एकमेकांची चौकशी वैगेरे वैगेरेंचे सोपस्कार. स्पेस असलेल्या नात्यांची ही गोष्ट, जगाच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने आकार घेते आहे. अमेरिकी दिग्दर्शक जिम जारमुश यांनी तीन वेगवेगळ्या कथांच्या माध्यमातून ‘फादर, मदर, सिस्टर, ब्रदर’ या सिनेमात याच गोष्टींचा पट उभा केला.

अमेरिकेतल्या एका भागात एकट्या राहत असलेल्या बापाला भेटायला गेलेली मुलं आणि त्यांच्यात झालेला नाट्यमय संवाद, नव्याने होत असलेली मूल्यांची रचना उलगडतो. त्यात अधिक स्वातंत्र्य, अधिक मुक्ततेचा आग्रह आहे. सिनेमाच्या दुसऱ्या भागात आई आणि मुलींच्या नात्याचे वेगळे संदर्भ उलगडतात. आयर्लंडच्या डब्लिन शहरात राहणारी आई आणि तिच्या दोन मुलींमध्ये वर्षातून एकदा जेवायला भेटायची परंपरा असते. आई प्रसिद्ध कादंबरीकार. ‘अनफेथफुल टूमॉरो’सारखे भन्नाट विषय ती मांडत असते. पण, मुलींनी तिच्या कादंबऱ्यांविषयी बोलणे, चर्चा करणे तिला आवडत नाही.

आईला सगळे काही काटेकोर, नीट-नीटके, जिथल्या तिथे ठेवण्याची सवय. त्यामुळे वर्षातून एकदा भेटूनही वस्तू, पदार्थांच्या टेबलवरील मांडणीतला तोचतोचपणा मुलीला कंटाळवाणा वाटतो. सिनेमा पुढे जातो, तसे अनेक प्रश्न नव्याने पडू लागतात. अशा ‘मुक्त’ वातावरणातही, आपली समलिंगी जोडीदार दिसल्यावर आईला काय वाटेल, हा सवाल मुलीला सतावतो. सगळे काही व्यवस्थित सुरू आहे, कुणावरही अवलंबून नाही, माझे मी सांभाळते इत्यादी इत्यादी. स्वातंत्र्यासाठी हे सांगायचेच असते. काय बोलायचे, हा प्रश्न माय-लेकींमध्ये सतत निर्माण होत असतो. तुटलेल्या संवादातून निर्माण होणारी शांतता दिग्दर्शक कायम ठेवतो.

तिसऱ्या भागात मात्र सिनेमात भावा बहिणीच्या नात्यामधले प्रेम ओसंडून वाहते. आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर बालपण घालवलेल्या घराला शेवटची भेट द्यायला ते जातात. तिथे भावाने आधीच गोळा केल्याला एकेका गोष्टीतून आई-बापाची एकेक रहस्ये उलगडत जातात. शेवटी, सगळा पसारा गोळा करून एका गाळ्यात ठेवला जातो. या सगळ्या साहित्याचे काय करायचे, काही वस्तू आजोबांपासूनच्या. त्या तिथेच ठेवून दोघेही बाहेर पडतात. प्रश्न तसेच असतात. आठवणींचा काळ मागे पडत नाही. याच आठवणींच्या पदराने सिनेमाचे तिन्ही भाग जोडले जातात. बदलत्या वास्तवात नात्यांचे बंध उलगडणारी शेवटची फ्रेम, ‘पिफ’च्या समारोपाला साजेशी.

सिनेमा बघायला आलेल्या एकेकाला निदान एकेक प्रश्न इथून मिळाला आहे. आठवड्यात एक फ्रेम, एक लँडस्केप बघून झाला, हे समाधान सिनेप्रेमी व्यक्त करतात. त्यांनाही सिनेमा बघायला शिकायचे आहे. माध्यम साक्षरतेचे धडे गिरवायचे आहेत. त्यात कुणाला दिग्दर्शक, तर कुणाला अभिनेता-अभिनेत्री, प्रत्येकालाच सिनेमाचा भाग व्हायचे आहे. पण, असे होतेच असे नाही. सकस निर्मितीच्या शक्यता खुल्या करायच्या असतील, तर या पर्यावरणाला सर्व पातळ्यांवर सशक्त करणे गरजेचे. आर्थिक व्यवहार सुकर आणि सांस्कृतिक अनुभव समृद्ध व्हायला हवेत. त्यासाठी ‘पिफ’चा प्रयत्न अधिक व्यापक होणे आवश्यक. मोठ्या चित्रपट महोत्सवांमध्ये असलेल्या ‘सिनेबाजार’सारख्या काही गोष्टी सुटल्या असतील, काही रकाने भरायचे असतील, पण निर्मितीची उमेद सशक्त करण्याचे यश ‘पिफ’च्या वाट्याचे.

पंचविशीत प्रवेश करताना हा प्रयत्न अधिक जोमाने उभा राहील, सगळेच प्रेक्षक माध्यम साक्षरतेचे धडे गिरवलेले असतील, जाणत्यांनी व्यक्त केलेली ही अपेक्षा ‘पिफ’चा पडदा व्यापक करायला नक्कीच मदत करील. शेवटी, संवेदनशील तरुणांच्या कुतुहलाला मिळालेली सकस निर्मितीची वाट, हे यंदाच्या महोत्सवाचे यश.

tushar.suryawanshi@expressindia.com