पुणे : विमान इंजिन निर्मिती क्षेत्रातील जीई ऐरोस्‍पेस कंपनीने पुण्यात आणखी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्‍या पुण्यातील उत्पादन प्रकल्पाची क्षमता वाढवण्‍यासाठी १.४ कोटी डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा कंपनीने केली आहे.

जीई एरोस्पेसचा चाकण औद्योगिक क्षेत्रात उत्पादन प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१४ मध्ये झाले होते. या प्रकल्पाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कंपनीने या प्रकल्पात ३ कोटी डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. त्यातील १.४ कोटी डॉलरची गुंतवणूक कंपनीकडून आता केली जाणार आहे. ही गुंतवणूक अद्ययावत उत्‍पादन प्रक्रिया व ऑटोमेशनच्‍या माध्‍यमातून प्रगत इंजिनच्या सुट्या भागांच्या निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून जगभरात अत्याधुनिक विमान इंजिनच्या सुट्या भागांचा पुरवठा केला जाणार आहे.

याबाबत जीई एरोस्पेसच्या चाकणमधील प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजीत सिंग म्‍हणाले की, पुण्‍यातील आमच्‍या प्रकल्पाचा क्षमता विस्तार होत आहे. देशभरातील पुरवठादारांच्‍या जाळ्याच्या पाठिंब्‍यावर आमच्‍या प्रगत व्‍यावसायिक जेट इंजिनसाठी सुटे भाग पुरविले आहेत. यामध्‍ये सुरक्षितता व दर्जाला अधिक प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. या नवीन गुंतवणुकीमधून मेक इन इंडिया उपक्रमाप्रती आणि जागतिक ऐरोस्‍पेस उत्‍पादनामध्‍ये भारताची भूमिका प्रगत करण्‍याची आमची कटिबद्धता दिसून येते.

बहुव्‍यवसाय उत्‍पादन केंद्र म्‍हणून सुरूवात केलेला पुण्‍यातील प्रकल्पाच्या स्‍थापनेपासून जीई ऐरोस्‍पेसच्‍या जागतिक व्‍यावसायिक इंजिन निर्मिती प्रकल्पांसाठी उच्‍च तंत्रज्ञानाच्या ऐरोस्‍पेस भागांचा पुरवठादार बनला आहे. पुण्‍यातील या प्रकल्पाला ३०० हून अधिक पुरवठादारांच्‍या जाळ्याचे पाठबळ आहे. भारतातील २ हजार २०० हून अधिक पुरवठादार जीई ऐरोस्‍पेस सहयोगींपैकी आहेत. गेल्‍या १० वर्षांमध्‍ये या प्रकल्पाने ५ हजारांहून अधिक उत्‍पादन सहयोगींना अचूक उत्‍पादन प्रक्रियेमध्‍ये प्रशिक्षण दिले आहे, तसेच स्‍थानिक गुणवत्ता घडवण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

लीन ऑपरेटिंग मॉडेल

पुण्यातील प्रकल्पाच्या यशाचे श्रेय जीई ऐरोस्‍पेसच्या लीन ऑपरेटिंग मॉडेल फ्लाइट डेकला जाते. हे मॉडेल सुरक्षितता, दर्जा व कार्यक्षमतेवर भर देते. फ्लाइट डेकसह प्रकल्पाने अपव्‍यय कमी केला असून, प्रक्रिया कार्यक्षमता सुधारली आहे. तसेच, शॉप-फ्लोअर सुरक्षितता वाढवण्‍यासोबत उत्पादन वाढवले आहे. विमान इंजिनच्या महत्त्वपूर्ण सुट्या भागांसाठी नवीन उत्पादन सुविधा या प्रकल्पात लवकरच सुरू होत आहे.