आकाशवाणी अ‍ॅप श्रोत्यांच्या संख्येत पुणे देशात अग्रेसर

ऑनलाइन श्रोतासंख्येनुसार अ‍ॅपवर जगभरात ऐकल्या जाणाऱ्या आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांमध्ये पुणे आकाशवाणी ही सर्वाधिक ऐकली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची वाहिनी ठरली आहे

पुणे : अ‍ॅपवर आकाशवाणी ऐकणाऱ्यांच्या संख्येत २३ लाख ५० हजार श्रोत्यांसह पुणे शहर देशात अग्रेसर ठरले आहे. बंगळुरु दुसऱ्या क्रमांकावर तर, इंदूर तिसऱ्या क्रमांकावर आहे.  आकाशवाणीच्या २४० हून अधिक वाहिन्या जगभरातील ८५ हून अधिक देशांत न्यूज ऑन एअर या प्रसारभारतीच्या अधिकृत अ‍ॅपद्वारे ऑनलाइन ऐकल्या जातात. रेडिओच्या इतिहासात प्रथमच प्रसारभारतीच्या श्रोतागण संशोधन चमूने अ‍ॅपवरील आकाशवाणीच्या ऑनलाइन श्रोत्यांच्या संख्येची वर्गवारी करून त्याचे आकडे नुकतेच प्रसारित केले. या आकडेवारीनुसार प्रमुख शहरांतील गेल्या महिन्यातील श्रोतासंख्येच्या आकड्यांनुसार पुणे शहर हे साधारणपणे २३ लाख ५० हजार श्रोतासंख्येसहीत आकाशवाणीचे भारतातील सर्वांत जास्त श्रोते असलेले शहर ठरले आहे. त्यापाठोपाठ ११ लाख ८० हजार श्रोतासंख्या असलेले बंगळुरु आणि १० लाख २० हजार श्रोतासंख्या असलेले इंदूर ही शहरे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

ऑनलाइन श्रोतासंख्येनुसार अ‍ॅपवर जगभरात ऐकल्या जाणाऱ्या आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांमध्ये पुणे आकाशवाणी ही सर्वाधिक ऐकली जाणारी तिसऱ्या क्रमांकाची वाहिनी ठरली आहे. तर, विविध भारती पुणे एफएम वाहिनी नवव्या क्रमांकावर आहे. विविध भारती वाहिनी यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. हे अ‍ॅप वापरणाऱ्यांच्या संख्येतही पुणे शहर हे भारतातील सर्व शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे.

पुणे विभागात आकाशवाणीचे ‘पुणे आकाशवाणी’ हा मध्यम लहरी चॅनल आणि ‘विविध भारती पुणे एफएम’ अशा दोन रेडिओ वाहिन्या कार्यरत आहेत. यांवरून प्रसारित होणारे ग्लोबल मराठी, संस्कृतीच्या पाऊलखुणा, युववाणी, व्यक्तिवेध, सप्ताह विशेष चर्चा हे कार्यक्रम अ‍ॅपच्या माध्यमातून जगभरातील मराठी श्रोत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. शास्त्रीय व लोकसंगीत आणि बातम्यांसोबतच दर्जेदार व श्रवणीय कार्यक्रमांची निर्मिती, त्यांना मिळणारा श्रोत्यांचा प्रतिसाद यामुळे पुणे आकाशवाणीच्या श्रोतासंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आकाशवाणीच्या पुणे विभागीय केंद्राचे कार्यक्रम प्रमुख इंद्रजित बागल यांनी सांगितले.

पुणे आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोपातील मराठी बांधव आवर्जून ऐकतात. पुणे केंद्राच्या प्रसारित होणाऱ्या बातम्या विश्वासार्ह आहेत. ग्लोबल मराठी कार्यक्रमात परदेशामध्ये यशस्वी झालेल्या मराठी बांधवांच्या ऑनलाइन मुलाखती घेतल्या जातात. अ‍ॅपचा प्रचार झाल्यामुळे अनेक श्रोते विविध कार्यक्रमांसदर्भात ऑनलाइन पद्धतीने प्रतिक्रिया नोंदवितात. – इंद्रजित बागल, कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी पुणे विभागीय कार्यालय

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune is a leader in the number of all india radio app listeners akp