पुणे : गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावर अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून कामाची मुभा दिली. परंतु, हिंजवडी आयटी पार्क, वाकड, रावेतसह परिसरात वीजपुरवठा खंडित असल्याने घरून काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांची कोंडी झाली. विशेष म्हणजे, अनेक भागातील वीजपुरवठा तीन दिवसांनंतरही सुरळीत झालेला नाही.

वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका घरून काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांना बसला. हिंजवडी आयटी पार्क, वाकड, रावेत, किवळे, मारूंजी, जांभे, नेरे, कासारसाई भागात वीजपुरवठा आज सकाळी ९ वाजल्यापासून बंद होता. तो सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. कोलते पाटील लाईफ रिपब्लिक लाईफ टाऊनशिपमधील वीज पुरवठाही बंद होता. या टाऊनशिपमधील रहिवासी असलेला एक आयटी कर्मचारी म्हणाला की, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घरून काम करण्यात अडचणी येतात. पावसामुळे कंपनीने घरून काम करण्याची मुभा देऊनही काम करता येत नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे इन्व्हर्टरची सुविधा असेलच असे नाही. इन्व्हर्टर असेल तरी तो ४ तासापर्यंत चालतो. तोही बंद पडल्यानंतर काम नाईलाजाने बंद करावे लागते. घरून काम करताना वीज पुरवठा खंडित झाल्याने गैरसोयच अधिक होते.

पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्यासह पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे महावितरणने पाणी आलेल्या ठिकाणी असलेले फीडर आणि रोहित्रे खबरदारीचा उपाय म्हणून बंद केली. नंतर पाणी ओसरल्यानंतर ही रोहित्रे पुन्हा सुरू करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, त्यात पाणी गेल्याने ती बंद पडली. ती दुरूस्त करून सुरू करण्याचे प्रयत्न महावितरणकडून सुरू आहेत. वाकड परिसरात यामुळे काल रात्रीपासून सुमारे ४० हजार ग्राहकांच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला. त्यातील बहुतांश ग्राहकांचा पुरवठा दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत सुरळीत झाला आहे. अद्याप काही ग्राहकांच्या तक्रारी असून, त्या सोडविण्यात येत आहेत, अशी माहिती महावितरणने दिली.

रावेत भागात सर्वाधिक फटका

रावेत, पुनावळे, किवळे भागात वीजपुरवठा खंडित झाल्याचा सर्वाधिक फटका बसला. या भागात गेल्या 72 तासांपासून वीजपुरवठा खंडित आहे. यामुळे गृहनिर्माण सोसायटी यांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. इमारतीमधील लिफ्ट बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह अपंग लहान मुले रुग्ण यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्यासह पूरस्थिती निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद करण्यात आला. नंतर पाणी ओसरल्यानंतर वीज पुरवठा सुरू करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. आतापर्यंत ८० टक्के वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. उर्वरित ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. – सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण