पुणे : पुण्याच्या हिंजवडीत नेहमीच वाहतूक कोंडी असते. आयटी हब असलेल्या हिंजवडीत सध्या मेट्रो च काम सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. याचा थेट फटका आयटी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसतो हे नाकारू शकत नाहीत. वाहतूक कोंडी, वाढता पेट्रोल चा खर्च आणि वायू प्रदूषण यावर उपाय म्हणून आयटी कंपनीत काम करणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर आर्या कुमार गेल्या दोन महिन्यांपासून ईलेक्ट्रिक सायकल वरून प्रवास करत ऑफिस गाठत आहे. १० ते १२ किलोमीटर च अंतर तो इलेक्ट्रिक सायकल वरून कापत आहे.

आर्या हा मूळ रांची झारखंड येथील असून तो गेल्या आठ वर्षांपासून पुणे शहरात वास्तव्यास आहे. त्याला निसर्गाप्रती निस्सीम प्रेम आहे. दुचाकीवरून सांगवी ते आयटी हब हिंजवडीतील ऑफिस ला जाण्यासाठी आर्याला एक तास लागायचा, पण इलेक्ट्रिक सायकलमुळे अर्धा तास वेळेची बचत होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जात असल्याने आर्या समाधानी आहे.

हेही वाचा…Pune Porsche Car Accident : “मृत तरुणांच्या रक्ताच्या नमुन्यांत…”, अनिल देशमुखांचा मोठा आरोप; म्हणाले, “माजी गृहमंत्री म्हणून…”

हिंजवडीत वाहतूक कोंडी हा प्रश्न नेहमीचा आहे. वाहतूक कोंडी आणि पेट्रोल चा खर्च याचा आर्थिक फटका साहजिकच हिंजवडीत काम करणाऱ्या नोकरदारांना बसतो. पण, आर्याने ही अनोखी शक्कल लढवली आणि अवघ्या ३० हजार रुपयांची इलेक्ट्रिक सायकल खरेदी करून कायमचा यावर पर्याय शोधला आहे. एरव्ही दररोज दुचाकीला आर्याला शंभर रुपये लागायचे अस त्याने सांगितलं. त्याचबरोबर वाहतूक कोंडी चा सामना करावा लागायचा. आता वाहतूक कोंडी असली तरी इलेक्ट्रिक सायकलवरून तो सहज निघून जातो. गेल्या दोन महिन्यांपासून आर्या हा प्रयोग करत असून यात त्याला यश आले आहे. वेळेची, पैशांची बचत तर होतच आहे. पण, वायू प्रदूषण ला देखील आळा बसत आहे.