पुणे : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीच्या हिंजवडी आयटी पार्कमधील कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत आत्महत्या केल्या आहेत. या प्रकरणी ‘नॅसंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट’ (नाइट्स) या संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असून, उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
‘टीसीएस’मधील दोन महिला कर्मचाऱ्यांच्या छळाला कंटाळून एका पुरुष कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन २ जूनला आत्महत्या केली. अमित अभय ब्रह्मे (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या मुलाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याआधी जानेवारी महिन्यात ‘टीसीएस’मध्ये काम करणाऱ्या सुजल ओस्वाल या तरुणाने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एकाच कंपनीत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी सहा महिन्यांच्या कालावधीत आत्महत्या केल्याने नाइट्सने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, या दोन्ही आत्महत्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि त्याचा अहवाल ठरावीक कालावधीत सादर करण्यात यावा. राज्यातील ‘टीसीएस’च्या कार्यालयातील कामकाज पद्धतींची तपासणी करण्याचे निर्देश कामगार आयुक्तांना द्यावेत. यात तेथील कार्यपद्धती, कर्मचारी तक्रार निवारण व्यवस्था, छळ प्रतिबंधक यंत्रणा. मानसिक आरोग्य आधार कार्यक्रम, कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठीचे उपक्रम, कर्मचाऱ्यांचे कल्याण उपक्रम या सर्व बाबींची तपासणी करावी. तसेच, या प्रकरणी ‘टीसीएस’कडून सविस्तर अहवाल मागवून घ्यावा.
‘टीसीएस’ची भूमिका
या प्रकरणी ‘टीसीएस’ने म्हटले आहे की, ‘आमचे सहकारी अमित ब्रह्मे यांचे जाणे शोकदायी आहे. कर्मचाऱ्यांचे कल्याण हेच आमचे सर्वोच्च उद्दिष्ट असून, ब्रह्मे कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या प्रकरणी दोन महिला कर्मचाऱ्यांवर आरोप करण्यात आले असून, त्यातील तथ्यांची तपासणी केली जात आहे. तसेच, या बाबत तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले जात आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही. कर्मचाऱ्यांसाठी सन्मानजनक, पाठबळ देणारी आणि सर्वसमावेशक अशी कार्यसंस्कृती राबविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.’
स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करा
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत आयटी क्षेत्राचे योगदान मोठे आहे. रोजगारनिर्मितीसह निर्यात आणि कर महसुलाच्या बाबतीत हे क्षेत्र आघाडीवर आहे. असे असताना या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात नाही. कामाच्या ठिकाणी छळ होत असल्याच्या तक्रारी आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. त्यामुळे सरकारने आयटी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणी नाइट्सचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी केली.
