पुणे : पुण्यात आयटी क्षेत्रात गेल्या वर्षभरापासून कर्मचारी कपातीचे वारे सुरू आहे. त्यातच आता या क्षेत्रात नोकरीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आणखी एका मोठ्या कथित भरती घोटाळ्याचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणात एका आयटी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज या संघटनेने हा प्रकार उघडकीस आणला आहे.

फोरमने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील आयटी क्षेत्रात नव्या नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना लक्ष्य करून भरती घोटाळ्यांचे प्रकार वाढत आहेत. यापूर्वीही दोन कंपन्यांशी संबंधित कथित भरती घोटाळे उघड झाले होते. या प्रकरणांमध्येही नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली उमेदवारांकडून मोठ्या रकमा घेतल्याचे आरोप करण्यात आले होते. आता या प्रकरणातही जवळपास त्याच प्रकारची पद्धत वापरण्यात आली आहे.

कंपनीशी संबंधित सल्लागार आणि प्रतिनिधींमार्फत उमेदवारांकडून नोकरी देण्याच्या मोबदल्यात दीड लाख ते तीन लाख रुपयांपर्यंत रक्कम मागितली जात होती. अनेक उमेदवारांनी नोकरीच्या आशेने ही रक्कम भरल्यानंतर त्यांना कंपनीकडून ऑफर लेटर देण्यात आले. मात्र त्यानंतर काही काळातच या प्रक्रियेत गंभीर अनियमितता असल्याचे कर्मचार्‍यांच्या लक्षात आले. अनेक कर्मचाऱ्यांना ओळखपत्र, विमा संबंधित कागदपत्रे, तसेच औपचारिक रोजगार नोंदी यासारखी आवश्यक कागदपत्रे देण्यात आली नाहीत.

या आयटी कंपनीकडून गेल्या तीन ते सहा महिन्यांपासून वेतन दिले गेले नसल्याचा आरोपही कर्मचारी करत आहेत. त्यामुळे अनेक तरुण आयटी व्यावसायिक गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आणखी एक गंभीर बाब म्हणजे कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधी खात्यात कंपनीने कोणतीही रक्कम जमा केली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे कामगार कायदे आणि वैधानिक नियमांचे उल्लंघन झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात एकूण ७७ कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या असून, आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सुमारे १ कोटी ५४ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या तक्रारींच्या आधारे विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या इतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नोकरीसाठी पैसे देऊ नका

याबाबत फोरम फोर आयटी एम्प्लॉईज संघटनेचे सचिव प्रशांत पंडित म्हणाले की, अशा प्रकारच्या बनावट भरती प्रक्रिया, वेतन न देणे आणि वैधानिक लाभ न देणे याचा तरुण आयटी व्यावसायिकांच्या करिअर आणि आयुष्यावर गंभीर परिणाम होतो. अनेक पीडितांनी स्थिर नोकरीच्या आशेने स्वतःची बचत खर्च केली किंवा कर्ज काढून ही रक्कम भरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करून संबंधित सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. तसेच आयटी क्षेत्रातील भरती प्रक्रियेवर अधिक कडक देखरेख ठेवण्याची गरज आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळता येतील. याशिवाय नोकरी शोधणाऱ्या तरुणांना आणि आयटी व्यावसायिकांना कोणत्याही कंपनीकडून नोकरी देण्याच्या बदल्यात पैसे मागितले जात असल्यास सावध राहावे. नोकरी स्वीकारण्यापूर्वी कंपनीची विश्वासार्हता आणि वैधता नीट तपासून पाहावी.