देशातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्र सध्या आव्हानात्मक स्थितीतून जात आहे. देशातील आयटी कंपन्यांचे ग्राहक हे प्रामुख्याने युरोप आणि अमेरिकेतील आहेत. तेथे सध्या आर्थिक घसरणीचे वारे आहे. याचा फटका आयटी कंपन्यांना बसत आहे. नवीन व्यवसायाची मागणी कमी होण्याबरोबरच आधीच्या ग्राहकांकडून मागणीत घट होत आहे. याचा एकंदरीत परिणाम आयटी कंपन्यांच्या उत्पन्नावर होत आहे. देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांची कार्यालये पुण्यात आहेत. त्यामुळे त्याची झळ पुण्यापर्यंत पोहोचू लागली आहे. जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांपासून सुरू झालेले कर्मचारी कपातीचे लोण आता पुण्यातील आयटी कंपन्यांपर्यंत पोहोचले आहे.

आयटी क्षेत्रातील कर्मचारी कपातीचे दृश्य परिणाम आता पुण्यात दिसू लागले आहेत. अनेक कंपन्यांकडून काही महिन्यांपासून कपात सुरू असली, तरी याबाबत फारशी वाच्यता होत नव्हती. आयटी क्षेत्रातील कर्मचारी संघटना सोडल्यास याबाबत माहितीही बाहेर येत नव्हती. कर्मचारी कपात वाढू लागल्यानंतर आता याची चर्चाही वाढू लागली आहे. आयटी कंपन्यांकडून प्रामुख्याने मध्यम फळीतील कर्मचाऱ्यांची कपात सुरू आहे. आधीच आयटीमध्ये मंदीचे वारे असताना अशा कर्मचाऱ्यांना नवीन नोकरी लगेच मिळणे शक्य नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले हतबल कर्मचारी आता कामगार आयुक्त कार्यालयात येऊ लागले आहेत. याचाच परिणाम होऊन कामगार आयुक्त कार्यालयाकडे आयटी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. या सर्व तक्रारी प्रामुख्याने ‘२ अ समेट’अंतर्गत करण्यात येत आहेत. ‘टीसीएस’ या एकाच कंपनीतील आतापर्यंत सुमारे पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. यावरून कंपनीला नोटीस बजाविण्यात आली. या तक्रारींवर सुनावणीही झाली आहे.

याबाबत सहायक कामगार आयुक्त एस. टी. शिर्के म्हणाले, ‘आयटीतील कर्मचारी हळूहळू तक्रार करण्यास पुढे येत आहेत. प्रामुख्याने या तक्रारी बेकायदा पद्धतीने कामावरून काढून टाकल्याच्या आहेत. या सर्वच कर्मचाऱ्यांनी त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, अशी मागणी तक्रारीत केली आहे. त्याचबरोबर कामावरून काढून टाकल्याच्या काळातील भरपाई मिळावी, अशीही त्यांची मागणी आहे. या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी समेटाच्या आहेत. अशा तक्रारींमध्ये तक्रारदार आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावले जाते. समोरासमोर त्यांच्याशी संवाद साधून तक्रारदाराची मागणी न्याय्य असेल, तर त्यावर कार्यवाही करण्यास सांगितले जाते. दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवून आणण्यावर भर दिला जातो. मात्र, समेट न झाल्यास प्रकरण कामगार न्यायालयात पाठविले जाते.’

‘बेंचिंग’चा असाही फटका

एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला बेंचवर बसविण्यात आले. आयटी क्षेत्रात बेंचिंगच्या काळात कर्मचाऱ्याला कोणतेही काम दिले जात नाही. त्या काळात कर्मचाऱ्याला नवीन व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची मुभा असते. मात्र, या कंपनीने बेंचिंगमधील कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले. हा कर्मचारी कामावरच आला नाही आणि त्याने काहीही काम केले नाही, असा ठपका कंपनीने ठेवला. त्याचबरोबर बेचिंगच्या काळातील त्याचे वेतनही परत मागितले, असेही एक उदाहरण समोर आले आहे.

sanjay.jadhav@expressindia.com