पुण्यात एक रस्ता आहे, ज्याचे कौतुक होते, ते त्याच्यावर न पडलेल्या खड्ड्यांमुळे. पण, त्याचे महत्त्व तितकेच नाही. तो बदलांचा साक्षीदार आहे आणि बदल घडूनही इतिहासाच्या पाऊलखुणा टिकवून आहे. या रस्त्यावरील भरपूर झाडे तशीच आहेत. पण, व्हाइब काहीशी बदलते आहे. सद्गुरू जंगली महाराजांची समाधी असलेल्या या रस्त्यावर जुन्या-नव्याचा अनोख संगम घडतो आहे. याच रस्त्यावर पुणेकरांना जागतिकीकरणाची पहिली पावले अनुभवायला मिळाली. ऐसपैस जागा, जुने वाडे, बंगले आणि जगभरातल्या कंपन्यांची, ब्रँड्सची कार्यालये, दालने असलेल्या जंगली महाराज रस्त्यावर अनेक कहाण्या आकाराला आल्या, येत आहेत.
सन १९६१. पानशेतच्या पुराने पुण्याचा तोंडवळा बदलला. कित्येकांची स्वप्ने पाण्याखाली गेली. मुळा-मुठेच्या काठावर वसलेल्या पुण्यनगरीच्या अवाढव्य विकासाला बसलेला हा पहिलाच तडाखा. १९५२ पासून जंगली महाराज रस्त्यावर दिमाखात उभ्या असलेल्या तीन मजली ‘प्रकाश लॉज’ची देखणी इमारतही या पुराची साक्ष. इमारतीचा पहिला मजला पाण्याखाली गेलेला. त्या वेळी पाण्यात बुडालेल्या पुण्याच्या विकासाला नवा आकार देण्याची जबाबदारी पुणे महापालिकेचे पहिले आयुक्त स. गो. बर्वे यांनी समर्थपणे पेलली. त्यांच्या नावाचा चौकातच या रस्त्याचा प्रारंभ. त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवणारा. पुढे स. गो. बर्वे असा नीलफलक असलेला बंगला पुणेकरांनी अनुभवलेल्या या द्रष्ट्या प्रशासकाची कहाणी सांगतो.
थोडे पुढे आल्यावर हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा ‘अलबेला’ मराठी संगीतकार सी. रामचंद्र यांचा बंगलाही याच रस्त्यालगत. थोड्या आतल्या बाजूला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जवळचे सहकारी ज्येष्ठ समाजसेवक कृष्णराव गांगुर्डे, स्वातंत्र्यसेनानी बापुसाहेब गुप्ते यांच्या नावाचे परिसरातील नीलफलकही पुण्यातील सामाजिक-राजकीय चळवळींचा पडद्याआडचा इतिहास सांगणारे. अलीकडच्या काळात बालगंधर्व रंगमंदिरासमोर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळची जागा अनेक आंदोलने, निदर्शनांमुळे परिचित. प्रदर्शने असोत, की पथनाट्ये, त्यासाठीही जंगली महाराज रस्ता कायम आकर्षणाचा केंद्रबिंदू. नुकत्याच पार पडलेल्या सायकल स्पर्थेचा समोरोपही याच रस्त्यावर झाला. विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून पुण्यातील घडामोडींचा मध्यबिंदू म्हणून हा रस्ता चर्चेत आहेच.
काही कहाण्या माणसांच्या मनावर कोरल्या गेल्याने विस्मरणात जात नाहीत. महानगरांच्या अथक घुसळणीत वर्तमानाशी धागा जोडण्यासाठी त्यांचे महत्त्व अधिकच. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच्या डायमंड वॉच कंपनीत अशा अनेक कहाण्या आजही जिवंत होतात. ‘तेव्हा रिस्ट वॉचचा जमाना होता. सोन्यासारख्या चमकणाऱ्या घड्याळांसाठी नवरदेव रुसून बसायचे. एचएमटी विजय, एचएमटी कांचन अशी घड्याळे मोठमोठ्यांच्या मनगटावर शोभून दिसायची. प्रसिद्ध अभिनेते श्रीराम लागू त्यांचे घड्याळ इथूनच घेऊन जायचे. त्यांना चेन असलेले, ॲनालॉग घड्याळ लागायचे. राजकारण्यांनाही घड्याळांची हौस. आमच्या कंपनीत सगळ्याच विचारांचे लोक जमायचे. मोहन धारियांना भिंतीवरच्या घड्याळात झाड कोरून हवे असायचे. ‘वनराई’तल्या प्रत्येक पाहुण्याला ते हेच घड्याळ द्यायचे…’ चाळीस वर्षांपासून डायमंड वॉच कंपनीत काम करणारे सुभाष लायगुडे आठवणींचा पट उलगडत राहतात… ‘प्रत्येकाची एक वेळ असते. पूर्वी वीस-वीस जण काम करायचो, तरी गर्दी ओसरायची नाही. आता तिघेच आहोत. धंदा कमी झालाय.’ जुन्या धाटणीच्या डॉयमंड वॉच कंपनीच्या भिंतींवर लटकवलेल्या घडाळ्यांचे काटे आणि ‘जस्ट इन टाइम’च्या चकचकीत दालनातील ‘डिजिटल वॉच’ महानगरीय बदलांची साक्ष देत राहतात.
डेक्कन पीएमपी थांब्याजवळ ३० वर्षांपासून अधिक काळ अत्तर विकणारे ए. रज्जाक सांगतात, ‘पूर्वी वर्षातून एकदा दिवाळी, दसरा अशा सणांनाच सुंगध दरवळायचा, पर्फ्युमसाठी गर्दी व्हायची. आता मोबाइलच्या रिचार्जसारखं झालंय. रोज नवा सेंट हवा असतो.’ रज्जाक यांनी महानगरांचा वेगवान बदल शांतपणे पचवलेला आहे.
रस्त्यावर आताशा गर्दी वाढली आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्या या रस्त्यावर जागा मिळवायला स्पर्धा करतायेत. काही दालने नव्याने सुरू झालेली दिसतात, तर डेल्सी पॅरिससारखी आंतरराष्ट्रीय कंपनी १९४२ पासून आपली नाममुद्रा इथे टिकवून आहे. ‘मॅकडोनाल्ड’चे पुण्यातील पहिले दालन जंगली महाराज रस्त्यावरच उभे राहिले. आता तेही पुनर्विकासाला निघालेले दिसते. ‘आर डेक्कन’ नावाने शहरातला पहिला मॉल याच रस्त्यावर उभा राहिला. वाहतूक कोंडीचा मुद्दा कायम चर्चेत असलेल्या पुण्यात पादचाऱ्यांसाठी सोय म्हणून पहिला भुयारी पादचारी पूल ‘गरवारे सर्कल’ही याच रस्त्यावर बांधण्यात आला आणि नव्या धाटणीचे पदपथही याच रस्त्याच्या कडेला थाटले गेले. त्या अर्थाने हा रस्ता सुधारणावादी.
पूर्वी हा रस्ता दुहेरी वाहतुकीसाठी खुला होता. नंतर मोठमोठ्या कंपन्यांची दालने वाढली, तशी गर्दी रस्त्यावर मावेनाशी झाली. ‘आम्ही इथे खेळायचो, तेव्हा इमारतींचे बांधकाम सुरूच होते. नदी स्वच्छ होती. नदीत पोहणारे बरेच होते. आता नदीच्या बाजूने फिरणेही अश्यक आहे,’ बदलांच्या वेगाने निर्माण झालेला ताण सारिका व्हरगडे यांच्या बोलण्यात व्यक्त होतो. त्यांनी सांगितलेल्या बालपणाच्या आठवणींना हा ताण टिपला आहे. ‘बदल घडतील. पण, आठवणींची जागा दुसऱ्या कशालाही घेता येत नसते,’ इति सारिका.
इथली जुन्या-नव्याची सांगड घालणारी अनोखी ‘व्हाइब’पाहून चीन, इंडोनेशिया अशा पूर्वेकडील देशांतून येणारे विद्यार्थी आणि जर्मनी, फ्रान्ससारख्या पश्चिमेकडील देशांमधून येणारे पर्यटकही थक्क होतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पुण्यात येणारा प्रत्येकजण चकचकीत रस्ते, उंचच उंच इमारती, मोकळे-ढाकळे पदपथ आणि शिस्तबद्ध वाहतुकीचे स्वप्न घेऊन इथेच विसावण्याचे स्वप्न उराशी बाळगतात. काही रुळलेली पावले मात्र परतीच्या ओढीने व्याकूळ आहेत. ती महानगरांच्या झगझमगाटी वेगात थकलेली दिसतात.
‘पांडुरंगाच्या आशीर्वादाने भरपूर कमावले. आता गावाची वाट लागलीये. खडकवासल्याच्या नदीकिनारी असलेली शेती कसत, आयुष्याची अखेर शांतपणे काढायची आहे,’ अशी सुभाष लायगुडे यांनी व्यक्त केलेली इच्छा उमेदीतल्या तरुणांना मोलाचा सल्ला देते.
पुढच्या भागासाठी..
चकचकीत रस्ते, उंचच उंच इमारती, मोकळे-ढाकळे पदपथ आणि अस्ताव्यस्त वाहतूक. हाताला काम आणि पोटाला भाकरी मिळविण्यापलीकडची स्वप्ने घेऊन हजारो माणसे महानगरात येतात. त्यांच्या घुसळणीतून महानगरांचा आकार मिनिटागणिक बदलत असला, तरी पोत काहीसा तसाच राहतो. काही पाउलखुणा घट्ट रुतून राहतात. गर्दी वाढली, तरी रस्ते टिकतात. त्यांच्याच जीवावर विकासाचा डोलारा उभा राहतो, नि याच रस्त्यांच्या कहाण्या महानगरांच्या संवेदना सांगतात. पुण्याच्या पोटातील काही रस्त्यांच्या कहाण्या सांगणारे हे पाक्षिक सदर. या सदरच्या पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या रस्त्याचा इतिहास आणि वर्तमान जाणून घ्यायला आवडेल?
इंग्रजांच्या काळात शहरापासून जवळ ऐसपैस जागा म्हणून हा परिसर विकसित झाला. हा संपूर्ण रस्ता अनेक किस्से, कहाण्यांचा चालताबोलता पटच आहे. बालगंधर्व रंगमंदिरापासून गरवारे सर्कलपर्यंतच जंगली महाराज रस्ता आहे, असा समाज तरुणांमध्ये दिसतो. तो दूर करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.- सुप्रसाद पुराणिक, इतिहास अभ्यासक
ईमेल — tushar.suryawanshi@expressindia.com
