पुणे : ‘जपानमधील कंपन्यांनी पुणे शहरात गुंतवणूक करावी. त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा राज्य सरकार, पुणे महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील,’ अशी ग्वाही महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली. पुणे आणि जपानमधील ओकायामा शहराच्या मैत्रीपूर्ण संबंधांना यंदा २० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर नागपुरे यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले जपान दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात महापौरांसह शिष्टमंडळाने ओकायामा प्रीफेक्चरचे गव्हर्नर रुयता इबालागी यांची सदिच्छा भेट घेऊन दोन्ही शहरांमधील संबंध अधिक दृढ करण्याबाबत चर्चा केली.
आयुर्वेद, स्मार्ट ॲग्रिकल्चर, योग व वेलनेस या क्षेत्रांत ओकायामा आणि जपानी कंपन्यांबरोबर संयुक्त संशोधन आणि गुंतवणुकीचे प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आले. पुण्यात येणाऱ्या जपानी उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय सहकार्य देण्याची ग्वाही महापौर नागपुरे यांनी दिली. या वेळी माजी नगरसेविका वंदना भिमाले, ‘पीएमपीएमएल’चे संचालक अजय खेडकर, ‘असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान’चे समीर खळे उपस्थित होते.
भारत-जपान संबंधांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी उंची मिळाली असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जपानी उद्योग, तंत्रज्ञान आणि संस्कृतीला राज्यात प्रोत्साहन दिले आहे, असे महापौर नागपुरे यांनी या बैठकीत नमूद केले. याच पार्श्वभूमीवर पुण्यात जपानी कंपन्यांनी गुंतवणूक करावी, तसेच प्रादेशिक कार्यालये आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स सुरू करावीत, असे आवाहन देखील त्यांनी केले.
पुणे हे ऑटोमोबाईल, माहिती-तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमाचे प्रमुख केंद्र असल्याचे सांगत आयुर्वेद, स्मार्ट ॲग्रीकल्चर तसेच योग व वेलनेस या क्षेत्रांत ओकायामा आणि जपानी कंपन्यांसोबत संयुक्त संशोधन आणि गुंतवणुकीचे प्रस्तावही मांडण्यात आले. पुण्यात येणाऱ्या जपानी उद्योगांना आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय सहकार्य देण्याची ग्वाही महापौरांनी दिली.
नोव्हेंबरमध्ये पुण्याला येण्याचे निमंत्रण
पुणे-ओकायामा ‘सिस्टर सिटी’ संबंधांच्या यंदा २० वर्षे पूर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून ओकायामाचे गव्हर्नर आणि त्यांच्या औद्योगिक, प्रशासकीय शिष्टमंडळाला पुणे भेटीचे निमंत्रण देण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात या भेटीचे निमंत्रण देण्यात आले. पुण्यात जपानी भाषा, कौशल्य प्रशिक्षणाचे केंद्र सुरू करण्याबाबत, ओकायामा शहरात पुणे आणि मराठा स्थापत्यकलेच्या समृद्ध वारशाचे प्रतीक असणारे स्मारक किंवा सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली.
